२४ लाखांचे चित्र ठरले सर्वांत महाग
By admin | Published: December 12, 2015 01:33 AM2015-12-12T01:33:43+5:302015-12-12T01:33:43+5:30
बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपचे संस्थापक आणि जगविख्यात चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सुझा यांच्या चित्रांचा लिलाव नुकताच प्रभादेवी येथील सॅफ्रोनआर्ट कलादालनात पार पडला
मुंबई: बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपचे संस्थापक आणि जगविख्यात चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सुझा यांच्या चित्रांचा लिलाव नुकताच प्रभादेवी येथील सॅफ्रोनआर्ट कलादालनात पार पडला. या लिलाव कार्यक्रमाला कला क्षेत्रातील रसिक आणि कलाकारांनी हजेरी लावत चित्रांना लाखो-करोडोंची बोली लावली. या लिलावादरम्यान, सुझा यांची चित्रे एकूण ५ कोटी ५८ लाख ४८ हजारांना विकली गेली. लिलावात २४ लाखांचे चित्र सर्वांत महागडी कलाकृती ठरली.
जगभरातील चित्रसंग्राहक आणि कला रसिकांचे लक्ष या चित्र लिलावाकडे लागले होते. या लिलावात १९४७ साली सुझा यांनी रेखाटलेल्या ‘पिझन्ट्स इन गोवा’ या चित्रासाठी तब्बल २४ लाखांची बोली लावण्यात आली. तर सुझा यांच्या २०० चित्रांपैकी दहा चित्रांना १० ते २४ लाखांपर्यंतची किंमत मिळाली.
सुझा यांनी १९४० ते १९९० या काळात ऐतिहासिक चित्रे रेखाटली. लँडस्केप, पेन्सिल स्केचस्, न्यूड आर्ट आणि स्टील लाईफ अशा विविध शैलींत सुझा यांनी आपल्या कलाकृतींना जन्म दिला. सुझा यांनी जे.जे.स्कूल आॅफ आर्टमध्ये कलेचे धडे शिक्षण घेतले. मात्र १९४५ साली त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतल्याने त्यांना महाविद्यालयातून काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी कम्युनिस्ट पक्षातही सक्रिय सहभाग घेतला होता.
याविषयी, सॅफ्रोन आर्टचे सहसंस्थापक दिनेश वझिरानी म्हणाले की गेल्या काही वर्षांत कलाकारांपुरती सीमित राहणारी कला चार भिंतीपल्याड आली. आणि मग कलादालनांमुळे या कलाकृती थेट कलाकारांना सहज उपलब्ध होऊ लागल्या. त्यामुळे कलाकृतींचा बाजार तेजाळला आहे.
अशाप्रकारे दिग्गजांच्या कलाकृतींच्या लिलावातून नव्या पिढीला या कलाकृती सहज उपलब्ध होतात. शिवाय, कलारसिक आणि चित्रसंग्राहकांसाठी ही पर्वणीच असते. (प्रतिनिधी)