मुंबई : बदलापूर येथील दुर्घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या आंदोलनानंतर बदलापूर ते कर्जत- खोपोली या मार्गावरील लोकल सेवा ठप्प पडली होती. या मार्गावरील ५० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या, तर २४ मेल व एक्स्प्रेस ठाणे, दिवा, पनवेलमार्गे सीएसएमटीच्या दिशेने वळविण्यात आल्या. त्यामुळे मेल व एक्सप्रेस गाड्यांना सीएसएमटी गाठण्यासाठी १५ ते ३० मिनिटे उशिरा झाला होता.
तसेच अंबरनाथ सीएसएमटी या लोकल सेवा सुरू असल्या तरी विलंबाने धावत असल्यामुळे सीएसएमटीसह उर्वरित स्थानकांवर संध्याकाळी पीक अवरला गर्दी झाली होती. सुमारे १० तासांनी म्हणजे रात्री ८.०५ वाजता बदलापूर आणि कर्जत खोपोली दरम्यान लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. त्यापूर्वी हलके इंजिन मार्गावरून चालवून मार्गाची सुरक्षितता निश्चित करण्यात आली. मंगळवारी स. ९.३० वाजल्यापासून सीएसएमटी ते अंबरनाथपर्यंतच्या अप व डाउन मार्गावरील सेवा सुरू सर्वसाधारण वेळेत धावत होत्या, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.
कल्याण -कर्जतदरम्यानच्या प्रवाशांच्या सोयीसाठी १०० बस चालविण्यात याव्यात, अशी विनंती रेल्वेकडून येथील विविध प्राधिकरणांना करण्यात आली होती. त्यानुसार, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५५ बस चालविण्यात आल्या होत्या, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. कोयना एक्स्प्रेस बदलापूर ते कल्याण आणि नंतर दिवा आणि पनवेलमार्गे कर्जतकडे पाठविण्यात आली.
डाउन मार्गावरील उदयपूर म्हैसूर, सीएसएमटी चेन्नई, श्रीगंगानगर- तिरुचिरापल्ली, सीएसएमटी- हैदराबाद सुपरफास्ट, सीएसएमटी - भुवनेश्वर या गाड्या वळविण्यात. अप मार्गावरील चेन्नई - एलटीटी, हैदराबाद - सीएसएमटी, यशवंतपूर बारमेर, कोईम्बतूर - एलटीटी, सोलापूर - सीएसएमटी वंदे भारत, पुणे निझामुद्दीन दुरंतो, चेन्नई- सीएसएमटी या गाड्या वळविण्यात आल्या.