६ महिन्यांत २४ नव्या गाड्या, आधुनिक सुविधांनी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 06:30 AM2017-10-25T06:30:16+5:302017-10-25T06:30:39+5:30
मुंबई : मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांचे आधुनिक लोकल गाडीमधून प्रवास करण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात येत्या ६ महिन्यांत २४ नव्या लोकल गाड्या दाखल होणार आहेत.
महेश चेमटे
मुंबई : मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांचे आधुनिक लोकल गाडीमधून प्रवास करण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात येत्या ६ महिन्यांत २४ नव्या लोकल गाड्या दाखल होणार आहेत. अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा या लोकल आहेत. या लोकल मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर गरजेनुसार चालवण्यात येणार आहेत.
सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात ७६ लोकल आहेत. चेन्नई येथील इंट्रिग्रल कोट फॅक्टरी येथे नवीन ईएमयू लोकलची बांधणी वेगाने होत आहे. सिमेन्स आणि बम्बार्डिअर प्रकारातील लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. नवीन लोकलसाठी आवश्यक सर्व परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परिणामी, लवकरच टप्प्याटप्प्याने मध्य रेल्वेवर नव्या लोकल धावणार आहेत. सध्याचे वेळापत्रक आणि गर्दी लक्षात घेऊन नव्या लोकल धावणार आहेत. मध्य रेल्वेवर गर्दीच्या वेळेत दर चार मिनिटांनी लोकल धावते. तर हार्बर मार्गावर दर आठ मिनिटांनी लोकल धावते. परिणामी, मध्य रेल्वेच्या ताफ्यात येणाºया लोकल हार्बर व ट्रान्सहार्बर मार्गावरही धावतील, असे संकेत अधिकाºयांनी दिले. सध्या मध्य रेल्वेच्या मार्गावर प्रशस्त जागा असलेले ठाकुर्ली हे यार्ड आहे. येथे २४ लोकल उभ्या राहू शकतात. ठाणे स्थानकाजवळ १० लोकल उभ्या करण्याची व्यवस्था आहे. त्याचबरोबर अंबरनाथ, बदलापूर व कर्जत येथेही लोकल उभी करण्याची व्यवस्था आहे. परिणामी, नव्या गाड्या उभ्या करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.
>आधुनिक सुविधायुक्त लोकल
आधुनिक सोईसुविधांनी युक्त असलेल्या २४ लोकल मध्य रेल्वेत दाखल होणार आहेत. स्टेनलेस स्टील बांधणीच्या लोकलमध्ये हवा खेळती राहावी, यासाठी विशेष सोय केलेली आहे. मध्य, हार्बर व ट्रान्स मार्गावरील आताच्या फेºया व प्रवासी संख्या लक्षात घेता आढावा घेऊन कोणत्या मार्गावर या लोकल चालवाव्यात यावर निर्णय घेण्यात येईल.
- डी.के. शर्मा,
महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे