Join us

प्राणिसंग्रहालयासाठी आरे संकुलात २४० एकर जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 2:25 AM

आरे कॉलनीत प्रस्तावित प्राणिसंग्रहालयासाठी आणखी १४० एकर जागा देण्याचे दुग्धविकास विभागाने मान्य केले आहे.

मुंबई : आरे कॉलनीत प्रस्तावित प्राणिसंग्रहालयासाठी आणखी १४० एकर जागा देण्याचे दुग्धविकास विभागाने मान्य केले आहे. यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या विस्तारासाठी आता एकूण २४० एकर जागा उपलब्ध होणार आहे. जंगल सफारी आणि दुर्मीळ प्राण्यांच्या संवर्धनासाठी या जागेचा वापर होणार आहे.मुंबईत भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा विस्तार आरे कॉलनीत करण्यात येत आहे. यासाठी शंभर एकर जागा यापूर्वीच मंजूर करण्यात आली आहे. त्याचबरोबर येथील जागेचा काही भाग मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या कारशेडसाठी जागा देण्यात येत असल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र जून २०१९ मध्ये जागेच्या हस्तांतरणाबाबत महापालिका आणि वन खात्यामध्ये सामंजस्य करार झाला. त्यानंतर या प्रक्रियेला वेग मिळाला आहे.या प्राणिसंग्रहालयाच्या विस्ताराचा प्रकल्प पाच वर्षांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. अन्य राज्यांतील प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत या प्राणिसंग्रहालयात नवीन प्राणी आणण्यात येणार आहेत. या जागेची मालकी मात्र दुग्धविकास विभागाकडेच राहणार आहे.या प्राणिसंग्रहालयातून मिळणाऱ्या उत्पन्नाची भागीदारी महापालिका आणि दुग्धविकास विभागांमध्ये विभागली जाणार आहे. तत्पूर्वी या प्राणिसंग्रहालयाचे सीमांकन करून सखोल सर्वेक्षण केले जाणार आहे.या १४० एकर जमिनीपैकी बरीच जागा मोकळी आहे. तरी या जागेवरील तबेल्याच्या मालक आणि दुग्धविकास विभागातील वसाहतींचे पुनर्वसन केले जाणार आहे.पाचशे कोटींच्या या प्रकल्पांतर्गत प्राणिसंग्रहालयात दुर्मीळ प्राणी आणले जाणार आहेत. तसेच जंगल सफारी हे या प्राणिसंग्रहालयाचे वैशिष्ट्य असणार आहे.केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने या जागेसाठी परवानगी दिल्याने प्राणिसंग्रहालयाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :मुंबई