मुंबई लोकलच्या 'या' स्थानकांवर प्रवास ठरतोय जीवघेणा; गेल्या वर्षभरात ४५० प्रवाशांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 12:59 IST2025-02-18T12:59:24+5:302025-02-18T12:59:49+5:30

Mumbai Local Accident: मुंबई उपनरगरातील चार रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर गेल्यावर्षी सर्वाधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

2468 passengers died in Mumbai Suburban Railway in 2024 most of them died while crossing the line | मुंबई लोकलच्या 'या' स्थानकांवर प्रवास ठरतोय जीवघेणा; गेल्या वर्षभरात ४५० प्रवाशांचा मृत्यू

मुंबई लोकलच्या 'या' स्थानकांवर प्रवास ठरतोय जीवघेणा; गेल्या वर्षभरात ४५० प्रवाशांचा मृत्यू

Mumbai Local Accident: रोज लाखो प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या मुंबईलोकलबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मुंबईलोकलने प्रवास करताना दररोज अपघाताच्या घडत असल्याचे समोर येतय. विविध उपाययोजना करुनही हे अपघात थांबलेले नाहीत. अशातच मुंबईच्या उपनगरीय रेल्वेवरील मृत्यूंमध्ये थोडीशी घट झाली असली तरी २०२४ मध्ये अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

२०२३ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये २५९० लोकांचा मृत्यू झाला होता. २०२४ मध्ये हा आकडा थोडा कमी झाला. मात्र त्यानंतरही गेल्या वर्षभरात एकूण २४६८ प्रवाशांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) आकडेवारीनुसार, मुंबई उपनगरीय रेल्वे विभागामध्ये मृतांची संख्या अजूनही खूप जास्त आहे. गेल्या दोन वर्षांत ठाणे, कल्याण, बोरिवली आणि वसई या स्थानकांवर रूळ ओलांडणे आणि गाड्यांमधून पडून सर्वाधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या वर्षी लोकल अपघातात २,४६८ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर २०२३ मध्ये २,५९० जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी एकूण १,१५१ जणांचा ट्रॅक ओलांडताना मृत्यू झाला. रेल्वे ट्रॅक ओलांडताना झालेले अपघात हे मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. या आकडेवारीनुसार गर्दी, अपघात आणि इतर  कारणांमुळे मुंबई लोकलध्ये दररोज  सरासरी सहा ते सात मृत्यू होतात. गेल्या २० वर्षांत ५०,००० हून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या दोन्ही विभागांकडून दररोज एकूण ३२०४ लोकल सेवा चालवल्या जात आहेत. यातून दररोज ७५ लाख प्रवाशांची वाहतूक होते.

२००५ ते जुलै २०२४ या काळात पश्चिम रेल्वेवर २२,४८१ लोकांचा मृत्यू झाला आणि २६,५७२ जण जखमी झाले. गेल्या दोन वर्षात सर्वाधिक मृत्यूची नोंद  वसई आणि बोरिवली रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत येणाऱ्या स्थानकांवर झाली आहे. २०२४ मध्ये पश्चिम रेल्वेवरील वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रेनमधून पडून सर्वाधिक ४५ जणांचा मृत्यू झाला. २०२४ मध्ये बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत  सर्वाधिक १३७ लोकांचा मृत्यू रुळ ओलांडल्यामुळे झाला. पश्चिम रेल्वेवर १३९४ उपनगरीय सेवा चालवल्या जातात ज्यातू दररोज ३५ लाख प्रवाशांची वाहतूक होते.

मध्य रेल्वेवर २००९ ते जून २०२४ दरम्यान २९,३२१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या दोन वर्षात सर्वाधिक मृत्यूची नोंद असणाऱ्या स्थानकांमध्ये कल्याण, ठाणे यांचा समावेश आहे. २०२४ मध्ये कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पुन्हा सर्वाधिक ११६ जणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचा हद्दीत २०२४ मध्ये रेल्वे रुळ ओलांडल्यामुळे १५१ जणांचा मृत्यू झाला. मध्य रेल्वेवर दररोज १८१० उपनगरीय लोकल सेवा चालवल्या जातात ज्यातन ४० लाख प्रवाशांची वाहतूक होते.

दरम्यान, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी आणि कसारा रेल्वे स्थानके कल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि ऐरोली रेल्वे स्थानके ठाणे रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत येतात. गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर रेल्वे स्थानके बोरिवली रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत येतात.

Web Title: 2468 passengers died in Mumbai Suburban Railway in 2024 most of them died while crossing the line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.