लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वाहनांबरोबरच रस्ते अपघाताच्याही घटना घडतात. गेल्यावर्षी २४ हजार ९७१ अपघात झाले. यामध्ये अपघातात ११,५६९ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये अपघात ९ टक्के, अपघाती मृत्यू १० टक्के आणि जखमींच्या संख्येत ३७ टक्के घट झाली, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.
वाढते अपघात आणि त्यातून होणारी मनुष्यबळाची हानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून, त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. राज्यात २०१८ मध्ये १३ हजार २६१, तर २०१९ मध्ये १२ हजार ७८८ अपघाती मृत्यू झाले होते.
महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये १०० अपघातामागे ४६.३ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक अपघात (३०७२ ) आणि अपघात मृत्यू (१४६२) हे डिसेंबर २०२० मध्ये झाले आहेत. कारण कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला लॉकडाऊन संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोक घराबाहेर पडले होते, तर सर्वांत अपघातामध्ये (५७२) आणि अपघाती मृत्यूमध्ये (३०३) सर्वाधिक घट एप्रिल २०२० मध्ये झाली आहे.