मॅट्रिमोनियल साइटवरून २५ तरुणींची फसवणूक, एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 05:20 AM2018-07-07T05:20:20+5:302018-07-07T05:21:17+5:30
मॅट्रिमोनियल साइटवरून लग्नाची मागणी करत, २५ तरुणींची फसवणूक करणाऱ्या एका ठगाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना शुक्रवारी यश आले.
मुंबई : मॅट्रिमोनियल साइटवरून लग्नाची मागणी करत, २५ तरुणींची फसवणूक करणाऱ्या एका ठगाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना शुक्रवारी यश आले. एका महिलेने चारकोप पोलिसांत तक्रार दिल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर, क्राइम ब्रांचच्या कक्ष ११ ने कृष्णा देवकाते (३१) नामक संशयिताला अटक केली आहे.
सविस्तर माहिती अशी, खासगी कंपनीत काम करणा-या सीमा (नावात बदल) या तरुणीने एका मॅट्रिमोनियल साइटवर नाव नोंदविले होते. जानेवारी २०१८ मध्ये देवकाते याने रिक्वेस्ट पाठविली. तो सरकारी सेवेत चांगल्या हुद्द्यावर नोकरीस आहे, अशी बनावट माहिती त्याने प्रोफाइलवर ठेवली होती. मात्र, मुळात तो एका कॉल सेंटरमध्ये काम करायचा. सीमाला त्याची प्रोफाइल आवडले. दोघांनी एकमेकांशी नंबर शेअर केले. संपर्क, त्यानंतर भेटीगाठी वाढल्या.
दरम्यान, काही बहाणे सांगत त्याने सीमाचे क्रेडिट कार्ड वापरून अनेकदा तिच्या संमतीशिवाय लाखो रुपये काढले, तसेच तिचा विनयभंग केला. या प्रकरणी सीमाने चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
क्राइम ब्रांच युनिट ११ चे प्रमुख पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचे पथकही या ठगाच्या मागावर होते. यात देवकाते हा कल्याणला असल्याची माहिती त्यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलीस निरीक्षक घाग, पोलीस उपनिरीक्षक उतेकर, झिने आणि पथकाने दोन दिवस सापळा रचून देवकाते याच्या मुसक्या आवळल्या. चारकोपसह बीकेसी, नवी मुंबईत कोपरखैरणे, पुण्यात हडपसर येथील २५ हून अधिक तरुणींची फसवणूक करत, ५० लाखांचा अपहार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, नालासोपाºयात अशाच प्रकारच्या गुन्ह्यातून तो जामिनावर सुटला होता. मात्र, पुन्हा तेच गुन्हे त्याने केले असून, या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. संशयिताला चारकोप पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.