वंचित घटकातील मुलांसाठी २५ टक्के प्रवेश राखीव
By admin | Published: February 24, 2015 10:39 PM2015-02-24T22:39:07+5:302015-02-24T22:39:07+5:30
शासन अधिनियमा नुसार पहिली अथवा प्रवेश स्तर वर्गासाठी दुर्बल तसेच वंचित घटकातील मुलांना अनुदानित-विनाअनुदानित शाळेत
उल्हासनगर : शासन अधिनियमा नुसार पहिली अथवा प्रवेश स्तर वर्गासाठी दुर्बल तसेच वंचित घटकातील मुलांना अनुदानित-विनाअनुदानित शाळेत २५ टक्के प्रवेश राखीव ठेवल्याचे परिपत्रक पालिका शिक्षण मंडळाने काढले आहे. तसेच चुकीच्या पध्दतीने प्रवेश प्रकीया करणाऱ्या शाळेवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी संघटनेने केली आहे.
उल्हासनगरातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित शाळांनी नर्सरी प्रवेश प्रक्रीया पूर्ण केली असून या प्रवेश प्रक्रीयेला विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बंडु देशमुख, मनोज शेलार यांनी विरोध केला आहे. अखेर पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ए.एल.बागले यांनी शासनाच्या शिक्षण अधिकार अधिनियमाअंतर्गत परिपत्रक काढले आहे. २०१५-१६ या वर्षासाठी मंडळ आॅनलाईन प्रवेश प्रक्रीया राबविणार आहे.
इयत्ता पहिली अथवा प्रवेश स्तर वर्गातील प्रवेशासाठी एक वेबसाईट सुरू केली असून २७ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यांन प्रवेश प्रक्रीया राबवून अर्ज करण्याचे आवाहन बागले यांनी केले आहे. वंचित, दुर्बल घटकांसाठी २५ टक्के प्रवेश राखीव ठेवल्याने गोरगरीबांना मोफत प्रवेश मिळणार आहे. शिक्षण मंडळाच्या परिपत्रकाने खाजगी विनाअनुदानीत इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रशासनाचे धाबे दणाणले असून या प्रक्रियेमुळे दुर्बल घटकातील मुलांना न्याय मिळणार असल्याचे विद्यार्थी संघटनेच्या बंडु देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)