मुंबई : सीमा हैदर आणि २५ जण पाकिस्तानमधून भारतात आलेत. आता दोन-तीन तासांत बॉम्बस्फोट होणार आहे. तेव्हा सांभाळून राहा, अशा आशयाची धमकी देणारा कॉल मुंबईपोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता. त्यानंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली. याप्रकरणी वनराई पोलिसांनी खोटी माहिती देणाऱ्या नागेंद्र शुक्ला (वय ३०) याला तत्काळ अटक केली.
शुक्रवारी मध्यरात्री मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा फोन आला होता. फोन करणाऱ्याने तो वनराई परिसरातून बोलत असून, सीमा हैदर व २५ व्यक्ती पाकिस्तानातून आले आहेत, तुम्ही सांभाळून राहा. कारण तुमच्या आसपास दोन ते तीन तासांत बॉम्बस्फोट होईल तेव्हा तुम्हाला समजेल, असे कॉलर पोलिसांना म्हणाला. त्यानंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली.
सणाच्या पार्श्वभूमीवर हा फोन संवेदनशील बाब असल्याने तत्काळ याबाबतची माहिती गुन्हे शाखा व वनराई पोलिसांना देण्यात आली. या फोनबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
- पोलिसांनी तपास करत नागेंद्र शुक्ला नामक संशयिताला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने दारूच्या नशेत हा फोन केल्याची कबुली दिली. हा फसवा फोन करत पोलिसांची दिशाभूल करणे तसेच अन्य संबंधित कलमांतर्गत त्याच्यावर वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मारण्याची धमकी देणारा ईमेल केंद्रीय यंत्रणांना नुकताच प्राप्त झाला होता, तर मुंबई पोलिसांनाही गेल्या पाच महिन्यांमध्ये ८० हून अधिक खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे दूरध्वनी आले आहेत.