दाजीपूर अभयारण्याच्या विकासासाठी २५ कोटी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:25 AM2020-12-12T04:25:16+5:302020-12-12T04:25:16+5:30

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्याचा भाग असलेल्या दाजीपूर अभयारण्याच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये देण्यात येतील, ...

25 crore for development of Dajipur Sanctuary - Chief Minister Uddhav Thackeray | दाजीपूर अभयारण्याच्या विकासासाठी २५ कोटी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दाजीपूर अभयारण्याच्या विकासासाठी २५ कोटी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्याचा भाग असलेल्या दाजीपूर अभयारण्याच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये देण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. दाजीपूर अभयारण्यातील निसर्ग पर्यटनास चालना मिळावी, स्थानिकांना रोजगार मिळावा, या दृष्टीने प्राधान्यक्रम ठरवून पर्यटन सुविधा निर्माण कराव्यात, त्याचा आराखडा तत्काळ सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

दाजीपूर अभयारण्य विकासाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दाजीपूर अभयारण्यात पर्यटनवृद्धीसाठी ऐतिहासिक हत्तीमहाल दुरुस्ती करणे आणि हत्तीसफारी सुरू करणे, राधानगरी येथे नौकाविहाराची व्यवस्था निर्माण करणे, तसेच राऊतवाडी धबधबा येथे पर्यटक सुविधा निर्माण करणे या बाबी प्राधान्याने निर्माण करा. तत्पूर्वी तेथे येण्यासाठी चांगले रस्ते आणि निवासव्यवस्था असणे आवश्यक असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून तेथील रिसॉर्टची दुरुस्ती आणि अद्ययावतीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.

अभयारण्यात फेरीसाठी अंतर्गत रस्ते वन्यजिवांना त्रासदायक ठरणार नाही, अशा पद्धतीने विकसित करावेत. पर्यटकांसाठी वनदर्शनासाठी इलेक्ट्रिक बस घेण्यात यावी, तसेच स्थानिक युवकांना गाइडचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा. हे करत असताना स्थानिकांना रोजगार मिळेल, याकडे कटाक्षाने लक्ष द्या, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. दाजीपूर अभयारण्यात एमटीडीसीच्या माध्यमातून सध्याचे पर्यटक निवास (रिसॉर्ट) अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याचे, तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने तेथील सुविधांचा विकास करण्यात येत असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: 25 crore for development of Dajipur Sanctuary - Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.