तीन रुग्णालयांच्या मेकओव्हरसाठी २५ कोटी; आरोग्यसेवेच्या आधुनिकीकरणाला वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 10:14 AM2023-11-12T10:14:35+5:302023-11-12T10:14:49+5:30
मुंबई : नांदेड, घाटी रुग्णालयात झालेले रुग्ण मृत्यू घटनेच्या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा नियोजन समितीच्या २५ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता ...
मुंबई : नांदेड, घाटी रुग्णालयात झालेले रुग्ण मृत्यू घटनेच्या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा नियोजन समितीच्या २५ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मुंबई शहरातील आरोग्य सेवेच्या आधुनिकीकरणाला वेग मिळणार आहे. राज्यातील आरोग्य सुविधा आणि नांदेड, घाटी रुग्णालयात झालेले रुग्ण मृत्यू घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विकास आणि नियोजन समितीमधून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते.
मुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जे. जे. रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा आढावा घेतला होता. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून आरोग्यविषयक कामे प्रस्तावित केली होती. या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीला शासनाकडून ५० कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला. यामध्ये रुग्णालयांसाठी औषधे साहित्य व साधनसामग्रीची खरेदी करण्यासाठी १२ कोटी, बांधकाम, दुरुस्ती, अग्निसुरक्षा आदींसाठी २० कोटी आणि हॉस्पिटल यंत्रसामग्रीसाठी १८.१९ कोटी असा निधी प्रस्तावित आहे.
या कामांना मिळणार प्राधान्य
सर जे. जे. समूह रुग्णालयात ४थ्या मजल्यावरील स्त्रीरोग ऑपरेशन थिएटर अद्ययावत करण्यासाठी २.५५ कोटी आणि न्युरो सर्जरी वॉर्ड क्र. २४ आणि २५ व कार्डिओलॉजी वॉर्ड क्र. २२ अद्ययावतीकरणसाठी ७ लाख ९६ कोटी आणि मेडिसीन वॉर्ड क्र. १० अद्ययावतीकरणासाठी ४.६१ कोटी
मुंबई शहरातील आरोग्य सेवांचे आधुनिकरण व सोयीसुविधा तसेच अत्यावश्यक औषधी उपलबद्ध होण्यासाठी मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीमार्फत आरोग्यविषयक योजनांना मान्यता देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा अधिक बळकट होणार आहे. - राजेंद्र क्षीरसागर, जिल्हाधिकारी