जीटी रुग्णालयात अत्याधुनिक ३ टेस्ला एमआरआय मशीनसाठी २५ कोटी मंजूर
By संतोष आंधळे | Published: February 19, 2024 08:32 PM2024-02-19T20:32:50+5:302024-02-19T20:33:27+5:30
या शासकीय रुग्णालयातील मशीनवर १००० ते २००० रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई: गेल्या काही वर्षांत आजाराचे निदान करण्यासाठी एमआरआय चाचणीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अचूक निदानासाठी अत्याधुनिक एमआरआय मशीनवर चाचणी व्हावी म्हणून डॉक्टर आग्रही असतात. त्यामुळे आता वैद्यकीय शिक्षण विभागाने जी. टी. रुग्णालयात अत्याधुनिक ‘३ टेस्ला एमआरआय मशीन’ विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विभागाने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, येत्या सहा महिन्यांत बसविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. खासगी रुग्णालायत एमआरआयसाठी ८ ते १२ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो, तर या शासकीय रुग्णालयातील मशीनवर १००० ते २००० रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
वैद्यकीय विश्वातील प्रगतीमुळे रुग्णाला होत असलेल्या आजारांचे निदान व्हावे यासाठी डॉक्टर प्रगत चाचण्यांच्या वापर करत असतात. त्यामध्ये एमआरआय ही चाचणीसुद्धा डॉक्टर सुचवीत असतात. खासगी रुग्णालयात किंवा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ही चाचणी मोठी खर्चिक असल्याने गरीब रुग्णांना परवडत नाही. याकरिता शासकीय रुग्णालयातसुद्धा ही चाचणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या चाचणीची मागणी असल्याचे अनेक ठिकणी चाचणी करून घेण्यसाठी प्रतीक्षा यादी असते.
या चाचणीमुळे डॉक्टरांना आजाराचे निदान करण्यास मोठी मदत होते. त्यासोबत त्यांना तत्काळ या आजारावर उपचार करण्यास मदत होते. सध्याच्या काळात एमआरआय चाचणी अतिमहत्त्वाची आहे. या चाचणी करण्यासाठी लागणाऱ्या नवीन अत्याधुनिक मशीन बाजारात उपलब्ध आहेत. या मशीनने केलेल्या चाचणीमुळे आणखी अचूक निदान होण्यास मदत होते. अजूनही काही सार्वजनिक रुग्णालयात ' १.५ टेस्ला ' या मशीनवर चाचणी केली जाते.
लवकरच निविदाप्रक्रिया
सध्या ३ टेस्ला एमआरआय हे अत्याधुनिक मशीन विकत घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने निधी मंजूर केला आहे. याकरिता लवकरच निविदाप्रक्रिया पार पाडली जाईल. विशेष म्हणजे यामध्ये सर्व एमआर सेंटरच्या सर्व खर्चाचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वीचे जे मशीन होते ते खूप जुने झाले आहे. त्यामुळे आता नवीन मशीन विकत घेण्याचा निर्णय घेत असल्याचे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.
‘३ टेस्ला एमआरआय’ची वैशिष्ट्ये
या मशीनमधील चुंबक मजबूत असल्याने इतर मशीनच्या तुलनेत यामध्ये शरीरातील अवयव आणि मऊ उतींचे ( पेशींची ) फोटो फिल्म मध्ये चांगली येतात. या अत्याधुनिक मशीनचा वापर विशेष करून मेंदू, पाठीचा कणा, सांध्यामधील मऊ ऊतक, हाडे आणि रक्तवाहिन्यांच्या आतील भागाचे फोटो चांगल्या पद्धतीने येतात.