Join us

अडीच कोटींचा रक्तचंदन साठा जप्त, जेएनपीए बंदरातून रक्तचंदनाच्या तस्करीचा सिलसिला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 5:37 AM

डीआरआय विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : जेएनपीए बंदरातून रक्तचंदनाच्या तस्करीचा सिलसिला कायम आहे. शनिवारी (१७) येथील सीमाशुल्क विभागाच्या डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत विदेशात तारखिळ्यांच्या नावाखाली पाठविण्याच्या तयारीत असलेल्या एका कंटेनरमधून ३०३० किलो रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या रक्तचंदनाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच कोटी रुपयांच्या घरात आहे. 

जेएनपीए बंदरातून तस्करीच्या मार्गाने रक्तचंदनाचा साठा विदेशात पाठविण्याच्या तयारीत असलेल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून जेएनपीटी सीमाशुल्क विभागाच्या डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाईला सुरुवात करून, बंदरातून संशयित कंटेनरचा शोध घेऊन  केलेल्या कारवाईत विदेशात पाठविण्याच्या तयारीत असलेल्या एका कंटेनरमधून ३,०३० किलो रक्तचंदनाचा साठा जप्त केला. कंटेनरमध्ये तीन पार्सलमध्ये  हा रक्तचंदनाचा साठा लपवून ठेवला होता. तारखिळ्याच्या बनावट नावाखाली  हा रक्तचंदनाचा साठा विदेशात पाठविण्यात येणार होता. मात्र, डीआरआय अधिकाऱ्यांनी त्या आधीच कारवाई केली. जेएनपीए बंदराला मागील अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय रक्तचंदन माफियांचा विळखा पडला आहे. त्यामुळे बंदरातून रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. काही प्रकरणात तस्करांच्या काही हस्तकांना पकडण्यातही यश आले आहे. मात्र, रक्तचंदन तस्करीच्या मुख्य सूत्रधारांना पकडण्यात अद्यापही डीआरआयच्या अधिकाऱ्यांना यश मिळाले नाही. 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस