२५ टक्के रस्त्यांसाठी १२ कोटी
By admin | Published: July 28, 2014 12:12 AM2014-07-28T00:12:02+5:302014-07-28T00:12:02+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेअंतर्गत सिमेंट काँक्रीटीकरणाच्या रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहेत.
अनिकेत घमंडी, डोंबिवली
कल्याण-डोंबिवली महापालिकेअंतर्गत सिमेंट काँक्रीटीकरणाच्या रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे एकूण रस्त्यांपैकी अवघे २५-३० टक्केच रस्ते डांबरीकरणाचे उरले आहेत. तरीही त्या रस्त्यांच्या देखभालीसाठी तब्बल १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असूनही पावसाच्या एकाच महिन्यात ठिकठिकाणच्या हमरस्त्यांसह गल्लीबोळातील रस्त्यांवर खड्ड्यांंचे प्रमाण लक्षणीय आहे.
एवढेच नव्हेतर रस्त्यांच्या कडेला असलेल्या जागेत केबलसह अन्य कामांसाठीही तब्बल ८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, तेथेही प्रचंड दुरवस्था असल्याचे विरोधकांनीच स्पष्ट केले. त्यामुळे एकंदरीतच महापालिकेच्या प्रशासनावर कोणाचाही अंकुश नसल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.
महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेनेते विश्वनाथ राणे यांनीच ही कोट्यवधींची आकडेवारी देऊन पोलखोल केली आहे. गेल्या आठवड्यापासून ‘लोकमत’ने डोंबिवलीसह कल्याणमधील रस्ते वाहतुकीला खड्ड्यांमुळे ब्रेक लागत असल्याच्या वृत्ताचा धांडोळा घेतला आहे. मात्र महापालिकेतील संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी मात्र लोकमतच्या प्रतिनिधींनाच ‘सांगा सांगा कुठे आहेत खड्डे’ असे विचारले आहे. त्यामुळे वातानुकूलित दालनात बसून कागदी घोडे नाचविणाऱ्यांचे ेअज्ञान उघड झाले आहे. त्यातच रातोरात खडीचा भराव टाकून खड्डे बुजवून होत्याचे नव्हते करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आल्याचेही निदर्शनास येत आहे.
उलटपक्षी जी खडी टाकली आहे ती गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे रस्त्याच्या इतस्तत: पसरली असून, त्यावरून घसरून एखाद्या वाहनाचा अपघात होण्याचीही शक्यता आहे. रविवारी शहरात एका शाळेतर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते, त्यातील धावपटूंनाही रस्त्यावर पसरलेल्या खडीचा त्रास झाला. राणे यांच्या माहितीनुसार, आता महापालिका क्षेत्रात केवळ २५
टक्केच डांबरी रस्ते उरले असून, त्यांचीही देखभाल महापालिकेला करता येत नाही. ज्यांना कंत्राट दिले आहे त्यांच्यावर अंकुश ठेवण्याबाबत अधिकारी सपशेल फेल ठरत आहेत. त्यामुळेच यामध्ये काही साटेलोटे आहे का? अशी टीकाही त्यांनी केली.
पाऊस असाच सुरू राहिला तर गणपती येतील त्या वेळेसही त्यांचे पितळ आणखीनच उघडे होईल, असेही खोचकपणे ते म्हणाले.