देहविक्रीसाठी आणलेल्या २५ मुली मुक्त
By admin | Published: July 1, 2015 12:03 AM2015-07-01T00:03:39+5:302015-07-01T00:03:39+5:30
जुहूगाव येथे देहविक्रीसाठी आणलेल्या २५ मुलींची सुटका गुन्हे शाखा पोलिसांनी केली आहे. गेली अनेक वर्षे या मुलींना देहविक्रीला भाग पाडले जात होते.
नवी मुंबई : जुहूगाव येथे देहविक्रीसाठी आणलेल्या २५ मुलींची सुटका गुन्हे शाखा पोलिसांनी केली आहे. गेली अनेक वर्षे या मुलींना देहविक्रीला भाग पाडले जात होते. त्यापैकी काही मुली बांगलादेशच्या असून, नोकरीला लावतो सांगून त्यांना भारतात आणण्यात आले होते.
जुहूगाव येथील अमरबाग इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दोन खोल्यांमध्ये या मुलींना ठेवण्यात आले होते. त्यापैकी एका मुलीने एक महिन्यापूर्वी तिथून पळ काढला होता. याच तरुणीने एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने गुन्हे शाखा पोलिसांकडे तिथे चालणाऱ्या गैरप्रकाराची माहिती दिली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे व गुन्हे शाखा युनिट-१चे वरिष्ठ निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या पथकाने तिथे छापा टाकला. या वेळी तिथल्या इतर २४ मुलींची सुटका करून पाच दलालांना अटक केल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले.
अटक केलेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तर सुटका केलेल्या मुलींपैकी काही बांगलादेशच्या तर काही झारखंड व इतर भागातील राहणाऱ्या आहेत. त्यांना नोकरीचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे जुहूगाव येथे आणून ठेवले होते. मात्र तिथे आणल्यानंतर त्यांचे अश्लील फोटो व व्हिडीओ बनवून त्याआधारे धमकावत त्यांना देहविक्रीस भाग पाडले जात होते. (प्रतिनिधी)
दलालांकडूनही त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला जात होता. बांगलादेशचाच नागरिक असलेल्या अन्वर नावाच्या व्यक्तीने या मुलींना फसवून आणले होते. मात्र तो कारवाईपूर्वीच तिथून पसार झाला असून, त्याचा शोध सुरू असल्याचेही मेंगडे यांनी सांगितले.