Join us

कर्नाक पूल पाडकामासाठी २५ तास ब्लॉक

By admin | Published: March 04, 2016 3:27 AM

सर्वांत जुना असलेला आणि धोकादायक बनलेला मशीद बंदरजवळील कर्नाक पूल पाडण्याचे नियोजन पालिका आणि मध्य रेल्वेकडून वेगाने सुरू आहे. हा पूल तोडण्याचे काम तब्बल दोन महिने चालणार आहे.

मुंबई : सर्वांत जुना असलेला आणि धोकादायक बनलेला मशीद बंदरजवळील कर्नाक पूल पाडण्याचे नियोजन पालिका आणि मध्य रेल्वेकडून वेगाने सुरू आहे. हा पूल तोडण्याचे काम तब्बल दोन महिने चालणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेवर येणाऱ्या या पुलाच्या महत्त्वाच्या पाडकामासाठी २५ तासांचा ब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाइन, हार्बरसह मेल-एक्स्प्रेस सेवांवर मोठा परिणाम होईल. असे असले तरी मेन लाइन १४ तर हार्बर १८ तासांनंतर टप्प्याटप्प्यानंतर खुली केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली. या ब्लॉकची तारीख अजून मध्य रेल्वेकडून निश्चित करण्यात आलेली नाही.मध्य रेल्वेवरील या सर्वांत मोठ्या पुलाचे पाडकाम सुरू होण्यापूर्वी वाहनांसाठी तो बंद केला जाईल. पूल तोडण्याचे बरेचशे काम पूर्ण केल्यानंतरच रेल्वे ट्रॅकवरील पुलाचा भाग पाडण्यात येईल. २५ तासांचा ब्लॉक घेताना लोकल आणि लांब पल्ल्यांच्या फेऱ्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. हार्बरचा समावेशहँकॉक पूल पाडताना मेन लाइन आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवर चांगलाच परिणाम झाला होता. मात्र त्यात हार्बरचा समावेश नव्हता. मशीदजवळील कर्नाक पूल खूप मोठा असल्याने मेन लाइन, एक्स्प्रेस मार्गासह हार्बरचे मार्गही बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र एकूणच सर्व परिस्थिती पाहता या कामासाठी मे किंवा जून महिन्यापर्यंत थांबावे लागेल. अथवा पावसाळ्यानंतरच हे नियोजन होऊ शकेल, असे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.(प्रतिनिधी)‘पालिका, रेल्वेने भूमिका स्पष्ट करावी’मशीद बंदरजवळील कर्नाक पूल पाडण्यापूर्वी नागरिकांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत उच्च न्यायालयाने महापालिका व रेल्वेला त्यांचे म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. सॅण्डहर्स्ट रोडजवळील हँकॉक पूल पाडण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय झाली आणि आता तसे होऊ नये, यासाठी उच्च न्यायालयाने महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. या याचिकेवरील सुनावणी लवकरच होणार आहे. > तारीख पे तारीख...कर्नाक पूल ५ जानेवारीच्या रात्रीपासून तोडण्यास सुरुवात होणार होती. मात्र सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील हँकॉक पूल अद्याप तयार झालेला नसल्याने वाहतूक पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे पूल पाडण्यासाठी २४ जानेवारी तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यालाही विरोध झाल्याने सध्या हे काम रखडलेले आहे.