‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना २५ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 07:50 AM2024-06-21T07:50:09+5:302024-06-21T07:50:38+5:30
गिरीश महाजन यांची घोषणा; सरपंच म्हणून गावच्या विकासासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील १८ सरपंचांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील ज्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ आज मिळाले, त्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ लाख रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे गुरुवारी ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळा पार पडला. या सोहळ्यात ग्रामपंचायत सरपंच म्हणून गावच्या विकासासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील १८ सरपंचांचा गौरव करण्यात आला.
मंत्री महाजन यांच्यासह या सोहळ्याला कृषिमंत्री धनंजय मुंडे, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, ‘लोकमत समूहा’चे अध्यक्ष विजय दर्डा, ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर, मुंबई ‘लोकमत’चे संपादक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंचांना पुरस्कार देण्याची चांगली प्रथा सुरू केल्याबद्दल महाजन यांनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले. या पुरस्कारासाठी गावागावांत स्पर्धा लागते, त्यातून गावच्या विकासासाठी सरपंच झटत असतात, त्यामुळे ‘लोकमत’ने या पुरस्काराच्या माध्यमातून गावांच्या विकासासाठी हातभार लावला असल्याचे महाजन यावेळी म्हणाले.
आमच्या सरकारने लोकांमधून थेट सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी सरपंच निवडीमध्ये अनेक गैरप्रकार व्हायचे, त्यातून गावच्या विकासाला खीळ बसायची. मात्र, आता थेट सरपंच नियुक्तीमुळे सरपंच मोकळेपणाने काम करू शकतो आणि त्यातून गावचा विकास होतो. पूर्वी सहा-सहा महिन्यांत सरपंच बदलायचा. आपणही सरपंच म्हणून काम केले आहे.
- गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री
ग्रामीण भागाच्या उद्धारासाठी महिला महत्त्वाच्या
- सरपंचांच्या कामाचा गौरव करतानाच त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीवही महाजन यांनी यावेळी करून दिली. ग्रामीण भागात उद्धार करायचा असेल तर महिला हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी बचत गटांना सक्षम करण्याचे काम सरकार करत आहे. राज्यातील अनेक बचत गट आपली उत्पादने निर्यात करत असून, त्यांची उलाढाल कोट्यवधीच्या घरात आहे.
- बचत गटांना मदत करण्याचे, त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम सरपंचांनी केले पाहिजे. सरकारची भूमिका आहे सगळी गावे हगणदारीमुक्त झाली पाहिजे, प्रत्येकाच्या घरी शौचालय असले पाहिजे, त्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यायला हवा, असेही महाजन यावेळी म्हणाले.