मध्य रेल्वेवर २५ मिनिटांच्या ‘इमर्जन्सी ब्लॉक’ने हाल; प्रवाशांमध्ये संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 09:26 AM2024-10-08T09:26:07+5:302024-10-08T09:26:30+5:30
ऐन दुपारी पीक अवर्सची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सोमवारी दुपारी मध्य रेल्वेवर २५ मिनिटांचा इमर्जन्सी ब्लॉक घेण्यात आला. तांत्रिक बिघाडामुळे भायखळा ते कुर्ल्यादरम्यान दुपारी १:३० ते १:५५ या कालावधीत हा ब्लॉक घेण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
डाउन जलद मार्गावर घेण्यात आलेल्या या ब्लॉकमुळे लोकल भायखळा स्थानकातून धीम्या मार्गिकेवर वळविण्यात आल्या. अचानक घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. गाड्या उशिराने चालत असल्याने दुपारच्या सुमारासही गाड्यांमध्ये आणि स्थानकांवर पीक अवर्सप्रमाणे गर्दी होती.
दुपारी १.०८ ची सीएसएमटी लोकल करीरोड स्थानकात दुपारी १:३० ला पोहोचली, तर भायखळा स्थानकात फलकावर दर्शवण्यात आलेली १:२१ ची जलद लोकल दुपारी २ वाजेपर्यंत आलीच नव्हती. दुपारी पावणेदोनच्या सुमारास भायखळा स्थानकातून कल्याण जलद लोकल फलाट क्रमांक १ वरून धीम्या ट्रॅकवर वळविण्यात आली. परिणामी सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आसनगाव, ठाणे, टिटवाळा या स्लो गाड्या सँडहर्स्ट रोड ते भायखळ्यादरम्यान एकामागे एक उभ्या होत्या, तसेच अंबरनाथ आणि कल्याण जलद गाड्या विद्या विहार आणि मुलुंड स्थानकात स्लोत ट्रॅकवर वळविण्यात आल्या.
अनपेक्षित घटनांमुळे इमर्जन्सी ब्लॉक
ब्लॉकचे मूळ कारण अस्पष्ट असले तरी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ट्रॅक फ्रॅक्चर, सिग्नल यंत्रणेत बिघाड अशा काही अनपेक्षित घटनांमुळे इमर्जन्सी ब्लॉक घेण्यात येतात. हे ब्लॉक प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने तत्काळ घेतले जातात.
कसारा दोन तास खोळंबली
दुपारीच्या सुमारास कसारा लोकल जवळपास २ तास खोळंबली होती, तसेच पाटलीपुत्र एक्स्प्रेस आणि नारायण मेल एक्स्प्रेसदेखील १२ ते १५ मिनिटांच्या उशिराने धावत होत्या.
रविवारचा ब्लॉक सोमवारपर्यंत वाढला असावा. रेल्वेने नियोजित ब्लॉकमध्ये कामे पूर्ण केली असती तर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचा असा खोळंबा झाला नसता. - सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद