‘तोतया’ पोलिसाकडून २५ जणांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 02:36 AM2018-03-15T02:36:36+5:302018-03-15T02:36:36+5:30
‘मी पोलीस खात्यात आहे. माझे वडीलही पोलिसात मोठ्या हुद्द्यावर आहेत,’ असे लोकांना सांगत त्यांचे काम करून देण्याचे आश्वासन द्यायचे.
मुंबई : ‘मी पोलीस खात्यात आहे. माझे वडीलही पोलिसात मोठ्या हुद्द्यावर आहेत,’ असे लोकांना सांगत त्यांचे काम करून देण्याचे आश्वासन द्यायचे. त्यानंतर, त्यांच्याकडून पैसे उकळून पसार होणाऱ्या राजेश वाल्मिकी (२८) नामक ‘तोतया’ पोलिसाला बुधवारी क्राइम ब्रांचच्या कक्ष १० ने अटक केली.
वाल्मिकी हा दिंडोशीमध्ये पत्नीसोबत राहतो. गुमास्ता, वाहन परवाना, मंत्रालयात नोकरी लावून देतो, माझी मंत्रालयात ओळख आहे, तसेच माझे वडीलदेखील मोठ्या हुद्द्यावर काम करतात, असे सांगत, त्याने ओशिवरा आणि एमआयडीसी परिसरात एका महिला आणि पुरुषाची फसवणूक केली. या प्रकरणी ओशिवरा आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार, क्राइम ब्रांचचे प्रभारी श्रीमंत शिंदे आणि त्यांचे पथक तपास करत होते. त्याच दरम्यान, वाल्मिकी हा आरे, गोरेगाव, दिंडोशी परिसरात गाडीवर ‘पोलीस’ अशी पाटी लावून फिरत असल्याची ‘टिप’ त्यांना मिळाली. त्यानुसार, त्यांच्या पथकाने वाल्मिकीला पकडण्यासाठी सापळा रचला. त्याच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवत, अखेर गोरेगाव पूर्वमधून वाल्मिकीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्याच्या अंगझडतीत आणि गाडीमध्ये पोलिसांचा गणवेश, लाल बूट, पोलीस लिहिलेला फलक, पोलीस दलात वापरली जाणारी काठी आणि संबंधित सामान तपास अधिकाºयांना सापडले.
गेल्या दोन वर्षांपासून वाल्मिकीने २० ते २५ लोकांची फसवणूक केली आहे. ज्यात त्याने १० लाख रुपयांचा अपहार केल्याचेही समजते. त्याला पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.