लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विघ्नहर्त्या गणरायाला गुरुवारी राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात वाजता गाजत निरोप देण्यात आला. यावेळी विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू नाशिक जिल्ह्यातील असून तेथे सहा जण बुडाले, तर एक जण मिरवणुकीतील ट्रॅक्टरची धडक लागून मरण पावला. याशिवाय रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यात दोघांचा, रायगड व पुण्यात तिघांचा तर पालघर, सांगली, मुंबई, सातारा, हिंगोली, चंद्रपूर, बुलढाणा जिल्ह्यांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
घुग्घुस (चंद्रपूर), गहूंजे (पुणे), साताराच्या कऱ्हाड तालुक्यातील खराडे येथे व बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर येथे नद्या व तलावांत बुडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका : गणेश विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात एकाचा, मिरज (जि. सांगली) येथे एका ५० वर्षीय व्यक्तीचा तर नालासोपाऱ्याच्या समेळपाडा येथे बेंजो वाजविणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. वाशी (मुंबई) येथील ढोल-ताशा पथकातील एकाचा वाद्य वाजवत असताना उलटीचा त्रास होऊन मृत्यू झाला.
३० तास पुण्यातील मिरवणूक, १०० डेसिबल वर गेला आवाज
टेम्पो गर्दीत घुसला दोघे ठार : ब्रेक निकामी झालेला टेम्पाे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत घुसून दाेघांचा मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीच्या पाचेरी आगर भुवडवाडी (ता. गुहागर) येथे गुरुवारी सायंकाळी घडली.