मुंबई - मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. १ मे, महाराष्ट्र दिनापासून त्यांना २५ टक्के सवलत मिळणार असून, मुंबई वन नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत उपलब्ध असणार आहे.
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीए यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा केली आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना ४५ ट्रिप किंवा ६० ट्रिपसाठी मुंबई - १ पासावर ही सवलत मिळेल.
असा घेता येईल लाभ६५ वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता १२ वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी ही सुविधा आहे. सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन) सोबत शाळा ओळखपत्र यांसारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत.मेट्रो लाइन २ अ आणि ७ च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्र दिल्यावर सवलती मिळू शकतील. नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई - १ कार्डवरदेखील सवलत असेल. तसेच ३० दिवसांची वैधता राहील. मुंबई १ कार्ड रिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासातही वापरले जाऊ शकते व रिचार्जही करता येईल.
सुविधांचा लाभज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे. त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे.