Join us

बेरोजगारीचा कळस! आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनाही नोकरी मिळेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 3:20 PM

आयआयटी मुंबईच्या २५ टक्के विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरीच न मिळाल्याचे समोर आलं आहे.

IIT Bombay Placement: देशात गेल्या काही वर्षांपासून सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमालीची वाढताना दिसत आहे. अनेक उच्च शिक्षित तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध नसल्याचे पाहायला मिळत आहेत. याचाच प्रत्यय आयआयटी मुंबईच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आला. आयआयटी मुंबईतील ७५ टक्के विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरी मिळाली आहे. मात्र देशातील प्रसिद्ध आयआयटी मुंबईचे २५ टक्के विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंट मिळवू शकले नाहीत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना बाहेर पडून नोकरीसाठी फिरावं लागणार आहे.

आयआयटी मुंबईच्या २०२४ च्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांचे सरासरी वार्षिक पॅकेज ७.७ टक्क्यांनी वाढले असले तरी, २५ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नसल्याचे समोर आलं आहे. एवढेच नाही तर किमान वेतन पॅकेजही यावर्षी ६ लाखांवरून ४ लाख रुपये म्हणजेच ३३ हजार रुपये प्रति महिना झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे १० विद्यार्थ्यांनीही हे पॅकेज स्वीकारले आहे. यावरून देशातील बेरोजगारीच्या स्थितीची कल्पना येते आहे. त्यामुळे आता आयआयटीतल्या विद्यार्थ्यांनाही इतक्या कमी पगारातही काम करावे लागत आहे. 

यावर्षी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सर्वाधिक वेतन पॅकेज २० लाख होते. २० लाखांच्या पॅकेजसाठी १२३ कंपन्यांकडून ५५८ ऑफर होत्या. तर २३० जॉब ऑफर या १६.७५ लाख ते २० लाख रुपयांच्या दरम्यान होत्या. यातील ७८ नोकऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांसाठी होत्या आणि २२ ऑफर १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या होत्या. युक्रेनमधील युद्ध आणि कमकुवत जागतिक अर्थव्यवस्थेमुळे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांची उपस्थिती कमी होती. प्लेसमेंटमधून एकूण ७५ टक्के विद्यार्थ्यांनी नोकऱ्या मिळवल्या आहेत.

या कॅम्पसमध्ये ट्रेडिंग, बँकिंग आणि फिनटेक कंपन्या या महत्त्वाच्या रिक्रूटर्स होत्या. एकट्या वित्त क्षेत्रात ३३ वित्तीय सेवा कंपन्यांकडून ११३ नोकरीच्या संधी होत्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, उत्पादन व्यवस्थापन आणि डेटा सायन्स यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातही विद्यार्थ्यांची निवड झाली.  कॅम्पसमध्ये शिक्षण क्षेत्रातील ११ कंपन्यांनी ३० नोकऱ्या देऊ केल्या आहेत. तर संशोधन आणि विकास क्षेत्रात ३६ कंपन्यांनी ऑटोमेशन, ऊर्जा विज्ञान आणि सेमीकंडक्टर तंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये ९७ पदांसाठी भरती केली आहे. ११८ सक्रिय पीएचडी विद्यार्थ्यांपैकी ३२ विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. 

टॅग्स :मुंबईआयआयटी मुंबईशिक्षणनोकरीबेरोजगारी