Join us

राज्यात १६ दिवसांत २५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:06 AM

मुंबईतील तिघे; आतापर्यंत एकूण ३८९ जणांनी गमावला जीवलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका पोलिसांनाही बसताना ...

मुंबईतील तिघे; आतापर्यंत एकूण ३८९ जणांनी गमावला जीव

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका पोलिसांनाही बसताना दिसत आहे. गेल्या १६ दिवसांत २५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर आतापर्यंत एकूण ३८९ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेली कोविड रुग्णालये, कोविड सेंटर, प्रतिबंधित क्षेत्र, अशा ठिकाणच्या बंदोबस्तासह अन्य सर्व प्रकारची कर्तव्ये राज्य पोलीस दल स्वतःचा जीव धोक्यात घालून काटेकोरपणे बजावत आहे. कर्तव्य बजावत असतानाच राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र पोलीस सेवेतील अधिकारी आणि अंमलदारांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा होण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत राज्यात ३८९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील २५ मृत्यू हे मागील १६ दिवसांतील आहेत. यात मुंबई पोलीस दलातील ३ पोलिसांचा समावेश आहे, तसेच पुणे, धुळे, नाशिकसह एसआरपीएफच्या जवानही आहेत. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा फटका पुन्हा पोलिसांना बसताना दिसत आहे.

* मी लवकरच कामावर येईन म्हणत सोडले प्राण

सायकलिस्ट अशी ओळख असलेले राज्याच्या सायबर विभागातील पोलीस हवालदार हर्षल रोकडे (३६) यांचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. १० एप्रिलपासून त्यांच्यावर सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. दोन ते तीन दिवसांत रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर लवकरच कामावर परतणार असल्याचे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले हाेते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे पाहून कुटुंबीय, सहकारीही आनंदात होते. मात्र, शनिवारी त्यांची ऑक्सिजनची पातळी घसरली आणि अचानक प्रकृती खालावल्याने रविवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

* पोलिसांसाठी कोविड सेंटर सज्ज

कालिना येथील कोळे कल्याण येथे पोलिसांसाठी २५० बेडचे कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. ते पोलिसांसाठी सज्ज असून, अन्य ठिकाणीही पोलिसांना विशेष सुविधा देण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

..........................................

.....