मुंबई अग्निशमन कर्मचाऱ्यांची २५ टक्के पदे रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 03:59 AM2018-09-25T03:59:36+5:302018-09-25T04:00:02+5:30
मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाºयांच्या मंजूर पदांपैकी सुमारे २५ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई : मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाºयांच्या मंजूर पदांपैकी सुमारे २५ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दलातील ३ हजार ८०७ मंजूर पदांपैकी ९२७ पदे रिक्त असल्याची माहिती मनपा प्रशासनाने माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना दिली आहे.
यासंदर्भात मनपा आयुक्त अजय मेहता आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांस पत्र पाठवून पर्याप्त संख्येत अधिकारी व कर्मचारी मंजूर करून रिक्त पदे भरण्याची मागणी शेख यांनी केली आहे. शेख म्हणाले की, गेल्या साडेपाच वर्षांत मुंबईत तब्बल ४९ हजार १७९ आपत्कालीन दुर्घटनांची नोंद आहे. दुर्दैवी बाब म्हणजे या दुर्घटनांत तब्बल ९८७ मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला, तर ३ हजार ६६ लोक जखमी झाल्याची माहिती मनपा दरबारी उपलब्ध आहे. तरीही बचावकार्य करण्यासाठी अग्निशमन दलाकडे ३ हजार ८०७ इतक्या मंजूर पदांपैकी केवळ २ हजार ८८० पदे भरलेली आहेत. मुंबई अग्निशमन दलाचे जनमाहिती अधिकारी आणि विभागीय अग्निशमन अधिकारी एस.डी. सावंत यांनी ही माहिती दिल्याचे शेख यांनी सांगितले. रिक्त पदांमध्ये उपप्रमुख अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, साहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी, वरिष्ठ केंद्र अधिकारी अशा उच्च पदांचाही समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वरिष्ठ केंद्र अधिकाºयांची एकूण ५० टक्के पदे रिक्त आहेत. तर केंद्र अधिकाºयांसाठी ७८ पदे मंजूर केल्यानंतरही केवळ ५२ पदे भरलेली आहेत. याउलट २६ पदे आजघडीला रिक्त असल्याचे मनपाने सांगितले. साहाय्यक केंद्र अधिकाºयांबाबत मनपा गंभीर असल्याचे दिसते.