'देशातील 25 राज्यांनी पेट्रोलचे भाव कमी केले, महाराष्ट्रात अजून का नाही?'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 04:11 PM2021-11-18T16:11:04+5:302021-11-18T16:12:30+5:30
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशभरात पेटोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे पाच व दहा रुपयांनी कपात झाली आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आंदोलनातून केली होती. आता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारने व्हॅट कमी करुन राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशभरात पेटोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे पाच व दहा रुपयांनी कपात झाली आहे. त्यानंतर, देशातील अनेक राज्यांनी व्हॅट कमी केला असून त्या प्रत्येक राज्यात पेट्रोलच्या किमती कमी झाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रात अद्यापही व्हॅट कमी करण्यात आला नाही. त्यावरुन, देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राज्य सरकारवर निशाणा साधला. 'केंद्राने पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रूपये कमी केल्यावर 25 राज्यांनी ते दर आणखी कमी केले. महाराष्ट्रात का नाही?', असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.
केंद्राने पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रूपये कमी केल्यावर 25 राज्यांनी ते दर आणखी कमी केले. महाराष्ट्रात का नाही?
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 18, 2021
(भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठक । मुंबई । दि. 16 नोव्हेंबर 2021)https://t.co/ZoUuRHrwq9
इंधनावरील व्हॅट कमी करा, भाजपचे आंदोलन
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारचे अनुकरण करत व्हॅट व अन्य करत कपात करुन जनतेला दिलासा दिला पाहिजे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात सातत्याने आंदोलने केली होती. त्यामुळे आता केंद्राने इंधनावरील करात कपात केल्यानंतर आघाडी सरकारने इंधनावर लावलेले सर्व प्रकारचे कर कमी करावे, अशी मागणी भाजपाने आंदोलनादरम्यान केली होती.
कर कमी करणे शक्य नाही
राज्याला उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. अजून आर्थिक घडी नीट बसलेली नसून पगार आणि दैनंदिन खर्च तसाच असल्याने पेट्रोल आणि डिझेलवरील राज्यांचा कर कमी होण्याची शक्यता नाही, असे स्पष्टपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त ते पंढरपूरात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. पेट्रोल-डिझेलच्या करांबाबत ते म्हणाले की, येत्या अधिवेशनापूर्वी यावर कर कमी करायचे असतील तर, किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेतला जाईल.