मुंबईत गेल्या वर्षभरात २५ हजार गर्भपात, १५ वर्षांखालील मुलींचे १५ गर्भपात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 08:31 AM2024-06-09T08:31:42+5:302024-06-09T08:32:19+5:30
Mumbai News: मुंबई शहरात एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत २५,८३५ महिला वा मुलींचा गर्भपात करण्यात आला असून, त्यापैकी १५ गर्भपात हे १५ वर्षांखालील मुलींचे, तर ३१८ गर्भपात वय वर्षे १५ ते १९ यादरम्यानच्या तरुणींचे आहेत.
मुंबई : शहरात एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत २५,८३५ महिला वा मुलींचा गर्भपात करण्यात आला असून, त्यापैकी १५ गर्भपात हे १५ वर्षांखालील मुलींचे, तर ३१८ गर्भपात वय वर्षे १५ ते १९ यादरम्यानच्या तरुणींचे आहेत. महापालिकेकडील नोंदीतून ही माहिती मिळाली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीत गर्भपाताची कारणेही नमूद केली आहेत. त्यानुसार बलात्कारातून झालेल्या गर्भधारणेमुळे ५३ महिलांचा गर्भपात करावा लागला, तसेच ३० ते ३४ वयोगटातील ८,०२१ महिलांचा गर्भपात करण्यात आला, असे या माहितीतून स्पष्ट होते.
नाव न सांगण्याच्या अटीवर डॉक्टरांनी सांगितले की, अनेक महिलांना गर्भनिरोधक गोळ्या कशा घ्यावात, याची माहिती नसते, तसेच पुरुषही गर्भनिरोधक साधन वापरत नसल्याने अनावश्यक गर्भधारणा राहते, अशा महिलाही गर्भपात करण्यासाठी पालिका रुग्णालयात येतात. गर्भनिरोधकाचा वापर करूनही ते प्रभावी न ठरल्याने गर्भधारणा राहिल्याचे सांगून गर्भपात करण्यासाठी महिला पालिका रुग्णालयात येतात.
गर्भपातामागे वेगवेगळी कारणे
गर्भधारणेमागील खरे कारण सांगण्यापेक्षा गर्भनिरोधकांच्या अपयशामुळे गर्भधारणा राहिल्याचे सांगितले जाते. काही प्रमाणात गर्भनिरोधक साधने अपयशी ठरत असतीलही; पण गर्भपात
करण्याची वेगवेगळी कारणे
असतात, असे डाॅ. दक्षा शहा यांचे म्हणणे आहे.
गर्भनिरोधकांचा अयोग्य वापर
सध्याच्या घडीला प्रभावी गर्भनिरोधक महापालिकेच्या दवाखान्यात आहे. मात्र, अनेक वेळा काही महिला किंवा पुरुष गर्भनिरोधकांचा वापर व्यवस्थित करत नाहीत. त्यामुळे गर्भधारणा राहते आणि महिला गर्भपातासाठी येतात, असे महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. दक्षा शहा यांनी सांगितले.
महिला आणि पुरुषांनी गर्भनिरोधकांची माहिती आणि त्यांचा योग्य पद्धतीने वापर यासाठी जवळच्या महापालिका दवाखान्याशी संपर्क साधला पाहिजे.
- डॉ. दक्षा शहा,
कार्यकारी आरोग्य अधिकारी
वयोगटनिहाय गर्भपात
वयोगट संख्या
१५ वर्षांखालील १५
१५-१९ ३१८
२०-२४ ३,६६९
२५-२९ ७,६०६
३०-३४ ८,०२१
३५-३९ ४,८०२
४०-४४ १,२७७
४५ ते पुढे १२७