लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सिमेंट काँक्रिटच्या मुंबईत हिरवळ आणखी वाढावी यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. पालिकेच्या उद्यान विभागाने येत्या वर्षभरात नवीन २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. उद्या ‘जागतिक पर्यावरण दिनानिमित्त २४ वॉर्डांत २०० पेक्षा अधिक झाडांची लागवड केली जाणार आहे. यासोबत, वर्षभरात नागरी वन उपक्रमात आणखी ५० हजार झाडे लावली जाणार आहेत.
मुंबईतील झाडांचे जतन व संवर्धन करण्यासाठी पालिकेकडून नवनवीन उपक्रम हाती घेतले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षसंवर्धन आणि वृक्षारोपणाचे कार्य अखंडपणे सुरू असल्यानेच मुंबईकरांच्या अवतीभोवती वृक्षसंपदा वाढली आहे. यंदाही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उद्यान विभागाकडून अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. याचा एक भाग म्हणून २५ हजार वृक्ष लागवडीचा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. सर्व २४ विभागांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात २०० झाडे लावण्यात येणार आहेत. येत्या वर्षभरात मुंबईमध्ये पारंपरिक पद्धतीने २५ हजार झाडे लावण्याचा मानस आहे. याशिवाय नागरी वने (मियावाकी) पद्धतीने वर्षभरात ५० हजार झाडे लावण्यात येणार आहेत.
प्रामुख्याने सोनचाफा, सीता अशोक, तामण, बकुळ, कांचन, बहावा, जांभूळ, नारळ, कडूनिंब, आंबा, पेरू, करंज, वड, पिंपळ यासारख्या स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मुंबईकरांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही यानिमित्ताने करण्यात येणार आहे.
३३ लाख झाडे देताहेत मुंबईकरांना प्राणवायु
पालिकेने आतापर्यंत मियावाकी पद्धतीने चार लाखांपेक्षा अधिक झाडे लावली आहेत. दरवर्षी पारंपरिक पद्धतीने २५ हजार झाडे लावण्यात येतात. त्यामुळे मुंबईच्या वृक्षसंपदेने ३३ लाखांचा आकडा ओलांडला आहे. ही ३३ लाख झाडे पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रातील सरकारी, खासगी, औद्योगिक जमिनींवर तसेच महानगरातील उद्यानांमध्ये आणि रस्त्यांभोवती बहरलेली आहेत.