मुंबई : विकास आराखड्यातून हरित पट्ट्यावर नांगर फिरवला जाण्याची भीती व्यक्त होत असताना आणखी एक धक्कादायक निर्णय लवकरच पालिका पातळीवर होणार आहे़ विविध प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या छाटणीची परवानगी देण्यास विलंब होत असल्याने साहाय्यक आयुक्तांनाच जादा अधिकार देण्याचा विचार सुरू आहे़ त्यानुसार २५ पर्यंत वृक्षछाटणीच्या प्रस्तावांना वॉर्डातील साहाय्यक आयुक्तच थेट आपल्या अधिकारात परवानगी देऊ शकणार आहे़आरे कॉलनी हा सर्वात मोठा हरित पट्टा नियोजन आराखड्यातून विकासासाठी खुला करण्याचे प्रस्तावित आहे़ यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठत असताना आता विकासकांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी या नियमांमध्ये शिथिलता आणण्याचे प्रस्तावित आहे़ त्यानुसार आतापर्यंत दहाहून अधिक वृक्ष छाटण्याचे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीपुढे आणणे बंधनकारक आहे़ मात्र वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक ४५ दिवसांतून एकदा होत असल्याने यामध्ये बराच कालावधी वाया जातो़ याचा फटका प्रकल्पांना बसत असल्याने बैठक ४५ दिवसांतून दोन वेळा घेण्याबरोबरच दहा वृक्षांऐवजी २५ वृक्षांपर्यंत छाटणी व पुनर्रोपणाच्या परवानगीचे अधिकार साहाय्यक आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव तयार होत आहे़ तसेच एखाद्या वृक्षांच्या पाहणीसाठी त्या विभागातील सदस्यालाच पाठविण्यात यावे, अशी तरतूदही करण्याचे चर्चेत आहे़ मात्र परस्पर निर्णय घेण्याचे अधिकार दिल्यास साहाय्यक आयुक्तांवर वचक राहणार नाही, असा सूर लोकप्रतिनिधींनी लावला आहे़ (प्रतिनिधी)
२५ झाडे तोडण्याची परवानगी वॉर्डातून ?
By admin | Published: May 01, 2015 1:14 AM