लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वंदे भारताची दुसरी आवृत्ती केशरी रंगात दिसणार आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे २५ वंदे भारत ट्रेन प्रगतिपथावर काम सुरु आहे. दुसऱ्या आवृत्तीच्या वंदे भारत ट्रेनमध्ये अधिक प्रगत आणि तांत्रिक सुधारणा करण्यात आलेल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
गेल्या वर्षीपासून आयसीएफ चेन्नईने एकूण २ हजार ७०२ डबे तयार केले आहेत, ज्यात वंदे भारत ट्रेनच्या नवीन आवृत्तीचे १२ डबे आणि रेल्वे बोर्डाने दिलेल्या लक्ष्यानुसार २ हजार २६१ एलएचबी डब्यांचा समावेश आहे. येत्या काही वर्षांत वंदे भारत एक्सप्रेसमध्ये नवीन प्रकारच्या गाड्यांसह सुमारे ३० प्रकारांमध्ये ३ हजार २४१ कोच तयार करण्याची योजना आयसीएफ चेन्नई आखत आहे.
चालू वर्षात वंदे मेट्रो नावाच्या वंदे भारत ट्रेनची दुसरी आवृत्ती सुरू करेल. ही ट्रेन आंतरशहर कमी अंतराच्या प्रवासासाठी सुरु करण्यात येणार आहे. वेगवान मालवाहतुकीसाठी वंदे भारत ट्रेनची निर्मिती करण्यात येणार आहे, सध्या आयसीएफने गती शक्ती ट्रेनच्या विकासाचे काम हाती घेतले आहे.