Chit Fund Scam: २५० कोटींचा चीट फंड घोटाळा उघडकीस, व्याजाचे आमिष दाखविणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 06:04 AM2022-11-18T06:04:07+5:302022-11-18T06:04:36+5:30
Chit Fund Scam: देशातील अनेक शहरांतून लहान व्यापाऱ्यांकडून चीट फंडाद्वारे लहान-मोठ्या रकमा गोळा करत त्यावर भरघोस व्याजाचे आमिष दाखवून पसार झालेल्या मिसबाहउद्दिन एस. या भामट्याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी बंगळुरू येथून अटक केली.
मुंबई : देशातील अनेक शहरांतून लहान व्यापाऱ्यांकडून चीट फंडाद्वारे लहान-मोठ्या रकमा गोळा करत त्यावर भरघोस व्याजाचे आमिष दाखवून पसार झालेल्या मिसबाहउद्दिन एस. या भामट्याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी बंगळुरू येथून अटक केली. ईडीच्या प्राथमिक अंदाजानुसार त्याने आतापर्यंत २५० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मिसबाहउद्दिन आणि सुहेल अहमद शरीफ या दोघांनी एन्जाज इंटरनॅशनल नावाची एक कंपनी स्थापन केली होती. त्यांच्या कंपनीने देशातील विविध शहरांतील लोकांकडून मुदत ठेवी स्वीकारल्या होत्या तसेच लहान-मोठ्या व्यापाऱ्यांकडूनही चीट फंडाद्वारे ठेवी स्वीकारल्या होत्या. या ठेवींकरिता या लोकांना वर्षाकाठी भरघोस व्याज देण्याचे आमिष दोघांनी दिले होते. मात्र, पैसे न मिळाल्यामुळे त्यांच्या विरोधात गुंतवणूकदारांनी बंगळुरू पोलिसांत गुन्हा दाखल केला. मात्र, या घोटाळ्याची आर्थिक व्याप्ती मोठी असल्यामुळे हा तपास ईडीकडे वर्ग करण्यात आला होता.
एन्जाज इंटरनॅशनल या कंपनीने गुंतवणूक तसेच आर्थिक व्यवहारांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचाही भंग केल्याचे ईडीच्या तपासात दिसून आले तसेच, त्यांच्या कंपनीने अशा पद्धतीने २५० कोटी रुपये गोळा केल्याचे ईडीच्या तपासात सकृतदर्शनी दिसून आले आहे. हे पैसे त्यांनी स्वतःच्या विविध बँक खात्यांमध्ये फिरविले होते. तसेच, या पैशांचा कोणताही स्रोत या दोघा आरोपींनी त्यांच्या वैयक्तिक आयकर विवरणातही दिला नव्हता. तसेच, कंपनीच्या ताळेबंदाचे लेखापरीक्षणही केले नव्हते, असे तपासात निदर्शनास आले. या घोटाळ्याची व्याप्ती २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना असून त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मिसबाहउद्दिनला अटक करून ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १९ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.