मुंबई : जगभरातील सिनेप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मुंबई फिल्म फेस्टिव्हल म्हणजेच ‘मामी’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात आयोजित करण्यात आलेल्या ‘मामी’मध्ये ७० हून अधिक महिला दिग्दर्शकांचे सिनेमे दाखवले जाणार, हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ‘मामी’च्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली गेली. यावेळी निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर, दिग्दर्शिका झोया अख्तर, फरहान अख्तर, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने, रोहन सिप्पी, अभिनेता राणा दगुबत्ती, अजय बिजली तसेच महोत्सव संचालिका अनुपमा चोप्रा, सहसंचालिका मैत्रेयी दासगुप्ता, फेस्टिव्हलच्या इंटरनॅशनल प्रोग्रामिंग विभागप्रमुख अनु रंगचर आदी मंडळी उपस्थित होती. या वैविध्यपूर्ण महोत्सवात ४० हून अधिक वर्ल्ड प्रीमिअर्स पार पडणार असून, ४५ आशिया प्रीमिअर्स आणि ७० हून अधिक दक्षिण आशिया प्रीमिअर्स होणार आहेत.. यंदा दक्षिण आशिया स्पर्धा सर्वांत महत्त्वाची असेल. दक्षिण आशिया आणि दक्षिण सिनेकर्त्यांसाठी, त्यांच्यातील प्रतिभेसाठी महत्त्वाचे केंद्र बनण्याचे या महोत्सवाचे नवे उद्दिष्ट या स्पर्धेतून दिसून येते.
मराठी टॉकीज... २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘मराठी टॉकीज’ या विभागात समकालीन मराठी सिनेमातील उत्कृष्ट कलाकृतींचा समावेश करण्यात येतो. यंदा या विभागामध्ये दिग्दर्शक आशिष बेंडे यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘आत्मपॅम्प्लेट’, मागच्या वर्षाची अखेर गाजवणारा रितेश देशमुखचा ‘वेड’, क्षितिज जोशी’ दिग्दर्शित ‘ढेकूण’ आणि परेश मोकाशींचा ‘वाळवी’ हे सिनेमा दाखवले जातील. सचिन चाटे यांनी या विभागातील सिनेमांची निवड केली आहे.
स्पर्धा आणि बरेच काही...साऊथ एशिया स्पर्धा विभागात विविध भाषांमधील १४ समकालीन आणि महत्त्वपूर्ण असे १४ सिनेमे असतील. यात सुमंत भट यांचा ‘मिथ्या’, लीझा गाझी यांचा ‘बरिर नाम शहाना’, फिडेल देवकोटा यांचा ‘द रेड सुटकेस’ या सिनेमांचा समावेश आहे. गाला प्रीमिअर साऊथ एशियामध्ये अनुराग कश्यप यांचा ‘केनेडी’, ताहिरा कश्यप यांचा ‘शर्माजी की बेटी’, रजत कपूर यांचा ‘एव्हरीबडी लव्हस सोहराब हांडा’, तर डायमेन्शन्स मुंबईमध्ये विदार जोशी यांचा ‘शुड आय किल मायसेल्फ ऑर हॅव अ कप ऑफ कॉफी?’ कुमार छेडा यांचा ‘हाफवे’, अंजनी चढ्ढा, दाखवले जातील. शॉर्ट फिल्म्स विभागामध्ये दिबांकर बॅनर्जी यांचा ‘बॅडमिंटन’, रिशव कपूर यांचा ‘नेक्स्ट प्लीज’, श्रीरंग पाठक यांचा ‘थेंब’ दाखवला जाईल.