मुंबई : वांद्रे येथील महावितरणच्या प्रकाश गड मुख्यालयासह फोर्ट आणि धारावी येथील कार्यालयात करार पद्धतीवर काम करत असलेल्या सुमारे २५० कामगारांचा पगार गेल्या दोन महिन्यांपासून झालेला नाही. परिणामी येथील कार्यालयात काम करत असलेल्या कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसात पगार झाला नाही तर काम बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणने प्रकाश गड आणि फोर्ट व धारावी येथील कार्यालयांमध्ये करार पद्धतीवर सुमारे दोनशे पन्नास कामगार विविध विभागात नेमले आहेत. ज्या एजन्सीद्वारे या कामगारांची नेमणूक झाली आहे त्या एजन्सीने सदर कामगारांना महिन्याच्या महिन्याला पगार देणे गरजेचे आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या कामगारांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली असून याबाबत महावितरणकडे आपले म्हणणे मांडले आहे.
मात्र महावितरण या कामगारांना दाद देत नसल्याची खंत सदर कामगारांनी व्यक्त केली आहे. कामगारांना पगार दिला नसल्याच्या कारणास्तव दंड म्हणून एका कामगारामागे दिवसाला दहा रुपये अशी रक्कम सदर एजन्सीला ठोठावली पाहिजे. मात्र महावितरण यापैकी कोणतीच कार्यवाही करत नसल्याने कामगार आता मेटाकुटीला आले आहेत. आणि जर का दोन दिवसात याबाबत ठोस निर्णय झाला नाही तर काम बंद आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सदर कामगारांनी दिला आहे. शिवाय कामगार आयुक्तांकडे देखील या प्रकरणात दाद मागितली जाणार आहे, असे देखील कामगार प्रतिनिधींनी सांगितले.