मुंबई, दि. १८- अठरापगड जातीच्या लोकांना सामावून घेणारी विविध धर्म, जाती, वंशाच्या लोकांना आपलेसे करणाऱ्या मुंबापुरीने ज्यू बांधवांनाही आपलेसे केले. शेकडो वर्षे पूर्वी अलिबागजवळ नौगावास लागलेल्या बोटीतून ज्यू भारतात आले, त्यांची एक शाखा कोचीनला पोहोचली ते कोचीनी किंवा सिरियन ज्यू म्हणून ओळखले जाऊ लागले. तर कोकणातील ज्यू बेने इस्रायली म्हणून ओळखले जातात. मुंबई शहराचा विकास होऊ लागला तसे अभ्यासात हुशार असणारे हे लोक मुंबई, ठाण्यामध्ये स्थायिक होऊ लागले. इस्रायलपासून इतके दूर मोठा काळ व्यतीत केल्यावरही त्यांनी आपल्या प्रथा, शनिवारी काम बंद ठेवण्याची प्रथा आणि सण सोडले नव्हते. २० सप्टेंबर रोजी त्यांचं नववर्ष रोश हाशन्ना सुरु होत आहे, त्यानिमित्ताने बेने इस्रायली व मुंबई यांच्या संबंधांची उजळणी होणे क्रमप्राप्त आहे.
'मुंबईचे वर्णन' लिहिणाऱ्या 'गोविंदराव माडगांवकरां'नी ज्यू लोक १७५० साली मुंबईत आले असावेत असं लिहून ठेवलं आहे. ते म्हणतात, 'मुंबईतील इस्राएल लोक मूलस्थायिक अष्टागर, भिवंडी, पेण, हपसाण, रोह्यां, अष्टमी, दांडेराजपूर, हरणई इतक्या ठिकाणचे. यांचे काही लोक आंग्र्यांच्या दरबारात लष्करी खात्यांत होते. हे पूर्वी तेलाचा व्यापार करीत, म्हणून आमचे लोक यांला शनिवार तेली म्हणत.'
या लोकांनी मुंबईत नाव कमावल्याबद्द्ल माडगांवकर लिहितात," ह्यांनी शिपाई कामात आपले शौर्य, हुशारी व प्रामाणिकपणा बराच दाखविला. यांतील कित्येक कम्यांडंट, मेजर सुभेदार, नाईक हवालदार झाले. ह्यांनू पलटणीत आजपर्यंत दंगा फितुरू केली नाही, सबब इंग्रजांचा त्यांजवर विश्वास बसला. हल्ली हे व्यापार करितात, इंग्रजी शिकून हपिसांत चाकरी करितात व पंतोजीचे कामही करितात." मुंबईत त्यांच्या निवासस्थानाबाबत आणि सिनेगाँग बद्दलही ते लिहितात," हे लोक आल्यापासून मांडवी, चिंचबंदर व डोंगरी इतक्या ठिकाणी राहतात. हे राहतात त्या मांडवीच्या भागास इस्राएल मोल्ला म्हणतात. एथे या लोकांचपैकी कित्येकांच्या मोठमोठाल्या हवेल्या असून ते सधन आहेत. ह्या लोकांची पुरातन मशीद मांडवीवर इस्राएल मोल्ल्यांत आहे ." माडगावकरांप्रमाणे बाळकृष्ण बापू आचार्य, मोरो विनायक शिंगणे यांनीही या सिनेगाँगबद्दल लिहिले आहे. मुंबई व आसपासचे लोक सिनोगाँगला मशीद असेच संबोधत असत.
या लेखकांनी उल्लेखलेली मशीद सामाजी हासाजी दिवेकर यांनी १७९६ साली बांधली. इंग्रजांच्या तर्फे लढताना टिपूने त्यांना कैद करुन ठेवले होते. मात्र त्यांचा धर्म विचारल्यावर टिपूला काहीच अर्थबोध झाला नाही. मात्र टिपूच्या आईने ज्यू लोकांचे नाव आपण धर्मग्रंथात एेकलंय असं सांगितलं म्हणून दिवेकर यांना कैद्यांच्या अदलाबदलीत सोडण्यात आलं. आपली सुटका देवानो केली अशा श्रद्धेपोटी दिवेकर यांनी ही मशीद बांधली. त्यास 'शार हारमाहीम' म्हणजे गेट आँफ मर्सी म्हटले जाते. दयेचे द्वार अशा अर्थाची ही वास्तू जुनी मशीद म्हणून ओळखली जाते. ठाण्यातील सिनेगाँग 'शार हाशमाइम' म्हणजे गेट आँफ हेवन, स्वर्गाचे द्वार म्हणून ओळखली जाते, ती १८७९ साली बांधण्यात आली. याशिवाय मदनपुरा येथे मागेन हासिदिम हे व कुर्ला येथेही प्रार्थनास्थळे आहेत. बेने इस्रायलींप्रमाणे इराकमधून बगदादी ज्यू मुंबईत आले. जेकब इलियास ससून यांनी फोर्टमध्ये १८८४ साली नेसेट इलियाहू हे सिनेगाँग बांधले तर डेव्हूड ससून यांनी १८६४ साली भायखळ्यात मागेन डेव्हीड हे सिनेगाँग बांधले. पेण, पनवेल, अलिबाग अशा अनेक जागी लहानमोठे सिनेगाँग आहेत. बहुतांश ज्यू इस्रायलला निघून गेल्यामुळे काही ठिकाणच्या प्रार्थना बंद पडल्या आहेत.
बगदादी ज्यू आणि ससून कुटुंबाचे मुंबईसाठी योगदान मोठे आहे. पुणे व मुंबई येथे रुग्णालये वाचनालये तसेच इतर अनेक इमारती या कुटुंबाने बांधल्या. आजही या वास्तूंचा उपयोग आपल्याला होत आहे. मुंबईचे महापौरपद एका वर्षासाठी डाँ. एलिजाह मोझेस यांनी भूषविले होते. तसेच हिंदी चित्रपटांमध्येही मुंबईच्या ज्यूंनी नाव कमावले होते. आता भारतामध्ये ज्यू बांधव ५००० पर्यंत राहिले असावेत असे सांगण्यात येते. त्यातील बहुतांश मुंबई व ठाण्यात राहतात. गेल्या वर्षी त्यांना अल्पसंख्यांक समुदायाचा दर्जा देण्यात आला.