महाराष्ट्रात २५०० अड्डे... खा. संजय राऊतांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 09:07 AM2024-03-07T09:07:02+5:302024-03-07T09:09:27+5:30
राज्यातील गोरगरीबांचे महिन्याचे पगार घरी न जाता शेकडो नोकरदार लोकही याच अड्डयांवर आपला पगार उडवत असल्याचे समजले
मुंबई - राज्यातील ऑनलाईन जुगाराच्या जाहिरातीवरुन माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रश्न उपस्थित करत आंदोलन केले होते. भारतरत्न सचिन तेंडुलकरने क्रिकेट खेळाच्या जुगाराला प्रोत्साहन देण्यावरुन कडू यांनी आवाज उठवला होता. आता, ऑनलाईन लॉटरीच्या जुगारावरुन खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या कित्येक जिल्हयांत या ऑनलाईन लॉटरी जुगाराचे २५०० पेक्षा जास्त अड्डे आहेत. या अड्ड्यांवर रोज हजारो लोकांची शेकडो कोटींची आर्थिक फसवणूक होत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यातील गोरगरीबांचे महिन्याचे पगार घरी न जाता शेकडो नोकरदार लोकही याच अड्डयांवर आपला पगार उडवत असल्याचे समजले. त्यामुळे असंख्य कुटुंबातील गृहणी, मुलाबाळांची अवस्था बिकट झाल्याचे संजय राऊत यांनी पत्रात मह्टले आहे. २०१८ साली केंद्र सरकारने देशभरातील अशा ऑनलाईन लॉटरी जुगाराबाबत सर्वच राज्यांना अशा बेकायदेशीरपणे चालणाऱ्या ऑनलाईन लॉटरीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. महाराष्ट्रातील या ऑनलाईन लॉटरी जुगाराबाबत सीबीआय चौकशीची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती, पण तरीही हे जुगाराचे अड्डे सुरूच आहेत व त्यानंतर हप्त्यांचे आकडे मात्र वाढल्याचं राऊत यांनी म्हटलं.
गृहमंत्री देवेंद्रजी, महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक तसेच कायदा-सुव्यवस्थेशी निगडित असा हा विषय आहे. अनेक सुशिक्षित तरुणांचे जीवन, त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन लॉटरी जुगारावर तत्काळ बंदी आणावी. महाराष्ट्राची आर्थिक लूट आणि मराठी जणांची फसवणूक थांबवावी. या निमित्ताने सुरू असलेल्या कोट्यवधींच्या लाचखोरीस आळा घालावा, अशी मागणी राऊत यांनी पत्रातून केली आहे.
माननीय गृहमंत्री महोदय
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 6, 2024
महाराष्ट्र राज्य
यांसी@Dev_Fadnavis@AmitShah@BJP4Maharashtra@mieknathshindepic.twitter.com/8eaN16Xo6v
दरम्यान, रम्मी सर्कल किंवा तत्सन ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून पैशांचे अमिष दाखवून मोठा जुगार खेळला जात असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे अनेस सेलिब्रिटीच या ऑनलाइन गेम्सच्या जाहिराती करत आहेत. त्यामुळे, तरुण पिढीच्या भवितव्यासाठी सरकार ऑनलाइन गेम्स किंवा ऑनलाइन लॉटरीसारख्या जुगारीवर नियंत्रण ठेवणार आहे का, असेही त्यांनी म्हटलं.