एसटीच्या ताफ्यात दाखल होणार २५०० बस; पर्यायी माध्यमांतून महसूल मिळविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 09:11 AM2024-10-07T09:11:32+5:302024-10-07T09:11:58+5:30

सध्या ताफ्यात १४,००० बसगाड्या आहेत.

2500 buses to enter st fleet try to get revenue through alternative means | एसटीच्या ताफ्यात दाखल होणार २५०० बस; पर्यायी माध्यमांतून महसूल मिळविण्याचा प्रयत्न

एसटीच्या ताफ्यात दाखल होणार २५०० बस; पर्यायी माध्यमांतून महसूल मिळविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात २५०० नव्या डिझेल लालपरी बस पुढच्या वर्षी दाखल होतील, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांनी दिली. तसेच, एसटीला सतत नफ्यात ठेवण्यासाठी एनएफबीआरसारख्या इतर पर्यायी माध्यमांतून महसूल मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील  असल्याचेही त्यांनी सांगितले. 

महामंडळाची ३०४ वी  बैठक नुकतीच झाली.  या बैठकीत ७०हून अधिक विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या आणखी २५०० डिझेल बस घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. त्यानुसार महामंडळ येत्या काही दिवसांत निविदा प्रक्रिया राबविणार असून, पुढच्या वर्षी  नव्या गाड्या दाखल होतील, असे कुसेकर यांनी सांगितले. 

नफ्याचे लक्ष्य

शाळकरी मुलांना पासची माहिती देणे, प्रवासी संख्या जास्त असलेल्या मार्गावर अधिक गाड्या सुरू करणे, डिझेल आणि देखभालीबाबत चालकांचे प्रबोधन करणे, नवीन गाड्यांच्या माध्यमातून प्रवासाचा दर्जा सुधारणे अशा अनेक उपाय योजनांच्या माध्यमातून महामंडळ नफ्यात कसे राहील, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असेही कुसेकर यांनी सांगितले.

एसटीचा ताफा

सध्या ताफ्यात १४,००० बसगाड्या आहेत. त्यापैकी  ५००० डिझेल गाड्या एलएनजीमध्ये आणि १००० गाड्या सीएनजीमध्ये रुपांतरीत करण्यात येत आहे. प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटीचा ताफा आणखी वाढविण्यात येणार आहे.

एसटीला नेहमी फायद्यात ठेवण्यासाठी जुनी येणी वसूल करण्यावर भर दिला जात आहे. या माध्यमातून आतापर्यंत सुमारे २०० कोटी वसूल करण्यात आले आहेत. पुढील सहामाहीतही तेवढेच उत्पन्न अपेक्षित आहे. - डॉ. माधव कुसेकर, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एसटी.

 

Web Title: 2500 buses to enter st fleet try to get revenue through alternative means

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.