म्हाडाच्या लॉटरीत गोरेगावची २ हजार ५०० घरे ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 06:52 PM2020-12-15T18:52:34+5:302020-12-15T18:52:53+5:30
MHADA lottery : १८ एकर भूखंडावर म्हाडाकडून ४ हजार ५०० घरांचे बांधकाम सुरु
मुंबई : गोरेगाव लिंक रोड येथे १८ एकर भूखंडावर म्हाडाकडून ४ हजार ५०० घरांचे बांधकाम सुरु असुन, यातील २ हजार ५०० घरेम्हाडाच्या लॉटरीत असण्याची शक्यता आहे. मात्र ही सगळी प्रक्रिया अगदीच प्राथमिक स्तरावर आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. याबाबत म्हाडाच्या अधिकारी वर्गाशी संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडून अधिक माहिती प्राप्त झाली नसली तरी येथील घरांचे प्राथमिक बांधकाम सुरु असल्याचे कळते.
मुंबई स्वत:चे घर असावे, असे स्वप्न प्रत्येकाचे असते. मात्र संपुर्ण आयुष्य व्यतीत केल्यानंतरही अनेकांना मुंबईत घर घेणे शक्य होत नाही. अशांना म्हाडा ‘परवडणारी घरे’ लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध करून देते. मात्र येथेही नशीब बलवत्तर असेल तर लॉटरीत घराचा नंबर लागतो. अशाच भाग्यवंतासाठी म्हाडा आता घरांची लॉटरी काढण्याच्या तयारीत असून, त्या लॉटरीत गोरेगाव पहाडी येथे बांधकाम सुरु असलेल्या २ हजार ५०० घरांचा समावेश असल्याची चर्चा आहे. आता लवकरच म्हाडाच्या घरांची लॉटरी निघण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप म्हाडाने ठोस निर्णय घेतलेला नाही. गोरेगाव येथील २ हजार ५०० घरांसह इतर ठिकाणांवरील घरेही म्हाडाच्या लॉटरीत असण्याची शक्यता आहे. मात्र ही घरे नेमकी कुठे आणि किती असतील? याबाबत म्हाडाने काहीच जाहीर केलेले नाही.
दरम्यान, म्हाडाच्या पुणे विभागात ५ हजार ६४७ सदनिकांसाठी म्हाडाच्या वतीने अर्ज नोंदणीचा आरंभ करण्यात आला. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील ५ हजार ६४७ सदनिका व भूखंडांच्या ऑनलाईन नोंदणीची सुरुवात झाली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना हक्काची घरे माफक किंमतीत मिळणार आहेत.