लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगाव लिंक रोड येथे १८ एकर भूखंडावर म्हाडाकडून ४ हजार ५०० घरांचे बांधकाम सुरू असून, यातील २ हजार ५०० घरे म्हाडाच्या लॉटरीत असण्याची शक्यता आहे. मात्र, ही सर्व प्रक्रिया प्राथमिक स्तरावर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून अधिक माहिती प्राप्त झाली नसली, तरी येथील घरांचे प्राथमिक बांधकाम सुरू असल्याचे समजते.
मुंबईत स्वत:चे घर असावे, असे स्वप्न प्रत्येकाचे असते. मात्र, घराच्या अवाक्याबाहेरील किमतींमुळे अनेकांना मुंबईत घर घेणे शक्य होत नाही. अशांना म्हाडा ‘परवडणारी घरे’ लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध करून देते. मात्र, येथेही नशीब बलवत्तर असेल, तर लॉटरीत नंबर लागतो. अशाच भाग्यवंतासाठी म्हाडा आता घरांची लॉटरी काढण्याच्या तयारीत असून, त्या लॉटरीत गोरेगाव पहाडी येथे बांधकाम सुरू असलेल्या २ हजार ५०० घरांचा समावेश असल्याची चर्चा आहे. मात्र, ही घरे नेमकी कुठे आणि किती असतील? याबाबत म्हाडाने काहीच जाहीर केलेले नाही.
* पुणे विभागात अर्ज नाेंदणी सुरू
म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील ५ हजार ६४७ सदनिका व भूखंडांच्या ऑनलाइन नोंदणीची सुरुवात झाली आहे.
.................