मुंबई : प्रदुषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिकेने प्लास्टीकविरोधी मोहीम तीव्र केली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात छापा टाकून २५०० किलो प्लास्टीकच्या पिशव्या जप्त केल्या आहेत. संबंधीत व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली आहे.
बाजार समिती परिसरामध्ये प्लास्टीकचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याची माहिती प्रदुषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी जयेश कुमार अँड कंपनी व सरस फुड्स मार्टवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणावरून २५०० किलो प्लास्टीक साठा सापडला. प्लास्टीक पिशव्या जप्त करून महानगरपालिकेच्या डंपींग ग्राऊंडवर पाठविण्यात आल्या असून त्याचे तुकडे करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. प्लास्टीक पिशव्या आढळलेल्या व्यापाऱ्यांकडून प्रत्येक पाच हजार रुपये दंडही वसूल केला आहे.
या कारवाईमध्ये प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशीक अधिकारी जयंत कदम,क्षेत्र अधिकारी अजित देशमुख, शशिकांत पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त भरत धांडे, जयेश पाटील, जयश्री अढळ, सुषमा देवधर, योगेश पाटील व इतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यापुढेही प्लास्टीकविरोधी मोहीम सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.