सचिन लुंगसे मुंबई : सौर, पवन, कृषी अवशेष, जल, सेंद्रिय कचरा अशा अनेक माध्यमातून अक्षय ऊर्जा निर्मितीबाबत महाराष्ट्राने एक पाऊल पुढे टाकले आहे. महाराष्ट्रात भविष्यात २ हजार ५०० मेगावॅट युनिट प्रकल्पाचे नियोजन आहे. ते कार्यान्वित झाल्यानंतर ऊर्जा निर्मितीसह पर्यावरण संवर्धनास हातभार लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील साक्रीजवळ १२५ मेगावॅट, बारामती येथे ५० मेगावॅट, चंद्रपूर येथे ५ मेगावॅट, तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत राळेगणसिद्धी येथे २ मेगावॅट आणि कोळंबी येथे २ मेगावॅट अशा एकूण १८४ मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमतेचे हे युनिट कार्यरत आहे. यात भर म्हणून आता अक्षय ऊर्जेअंतर्गत महाराष्ट्रात भविष्यात २ हजार ५०० मेगावॅट युनिट प्रकल्पाचे नियोजन आहे.नवीन व पुनर्वापर योग्य ऊर्जास्रोत मंत्रालयाच्या पुढाकाराने २००४ सालापासून भारतात २० आॅगस्ट रोजी ‘अक्षय ऊर्जा दिन’ साजरा करण्यात येतो. पारंपरिक वीज जाळ्यावरील ताण कमी होऊन ऊर्जानिर्मितीचे विकेंद्रीकरण व्हावे असाही यामागील हेतू आहे. याअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर विचार करता आभासी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतर्फे पहिल्या जागतिक सौर तंत्रज्ञान शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तंत्रज्ञान आणि वित्त खर्च कमी करणे आणि त्याद्वारे १ हजार गिगावॅट सौरऊर्जेची सुविधा आणि सदस्य देशांमध्ये २०३० पर्यंत १ हजार अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक संसाधने सौरऊर्जेसाठी एकत्रित करणे हे आघाडीचे उद्दिष्ट आहे.तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि विकास, आर्थिक संसाधने आणि साठवणूक तंत्रज्ञानाचा विकास, व्यापक उत्पादन आणि नवकल्पना यांनी युक्त परिपूर्ण परिसंस्था सक्षम करणे याकडे लक्ष केंद्रित केले जाईल. तंत्रज्ञानाची किंमत कमी झाल्यामुळे महत्त्वाकांक्षी सौरऊर्जा कार्यक्रम हाती घेता येतील. सौरऊर्जा हा परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे हे लक्षात घेऊन काम केले जात आहे.>यंत्रणा सक्षम करणे गरजेचे : मुंबईत जवळपास शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ अक्षय ऊर्जा टिकून आहे; आणि ती भविष्यात राहील. महाराष्ट्राचा विचार केल्यास पुणे, ठाणे अशा मोठ्या शहरांत अक्षय ऊर्जेच्या दिशेने आपण प्रवास करीत आहोत. मात्र अजूनही ग्रामीण आणि निमग्रामीण भागात पूर्ण वेळ अक्षय ऊर्जा देता आलेली नाही. याचे कारण वीज नाही, असे नाही. तर वीज वाहून नेणारी जी यंत्रणा आहे ती सक्षम नाही. ती सक्षम करण्यावर आपण भर दिला पाहिजे. - अशोक पेंडसे, वीज तज्ज्ञ
महाराष्ट्रासाठी २,५०० मेगावॅट अक्षय ऊर्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 4:28 AM