Join us

मालाड ते बोरिवली तिरंगा यात्रेत 25000 नागरिक सहभागी, रॅलीत १.२५ किमीचा तिरंगा ध्वज 

By मनोहर कुंभेजकर | Published: August 14, 2022 9:37 PM

उत्तर मुंबईतील सुमारे 25000 हजार नागरिक,उत्तर मुंबईतील सर्व आस्थापना, शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी १.२५ किलोमीटरचा अखंड तिरंगा 10000 नागरिकांनी हातात घेतला तर रॅलीत 25000 नागरिक सहभागी झाले.

मुंबई- मुंबई भाजपचे उपाध्यक्ष व चारकोपचे भाजप आमदार योगेश सागर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या उपक्रमाला १.२५ किमीचा तिरंगा ध्वज तयार करून नवा आयाम दिला. आज उत्तर मुंबईतील मालाड पश्चिम स्वामी विवेकानंद मार्ग, शिवमंदिर नटराज मार्केट येथून भव्य तिरंगा यात्रेची सुरुवात होऊन बोरिवली पश्चिम येथील स्वामी विवेकानंद पुतळा येथे समारोप झाला.

उत्तर मुंबईतील सुमारे 25000 हजार नागरिक,उत्तर मुंबईतील सर्व आस्थापना, शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी १.२५ किलोमीटरचा अखंड तिरंगा 10000 नागरिकांनी हातात घेतला तर रॅलीत 25000 नागरिक सहभागी झाले. या रॅलीत ५० घोड्यांचा ताफा सहभागी झाला होता. भारतमातेच्या रथासह हजारो मुली भगव्या हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या कपड्यात तिरंगा यात्रेत "रंग दे बसंती चोला" चे अद्भूत दृश्य चित्रित करत होत्या. देशभक्ती गीतांवर, वाद्यांवर युवाशक्तीचे सामूहिक नृत्य स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची गाथा सांगत होते.

स्वामीनारायण संप्रदाय, प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय ब्रह्मा कुमारी, खोजा समाज, वामनराव पै संप्रदाय, निरंकारी समाज, पुष्टी संप्रदाय, जैन समाज आदी विविध सामाजिक संप्रदायांच्या अनुयायांनी सहभाग घेतला.

या विशाल तिरंगा यात्रेच्या मार्गावर मालाड, कांदिवली, बोरिवली रस्त्यावर बारा ठिकाणी स्वागतासाठी बारा महाकाय तिरंगा कमान लावण्यात आले होते. विविध पारंपारिक वेशभूषेत शेकडो नागरी गटही सहभागी झाले होते. भारत माता बनलेल्या मुली भारतमातेच्या रथावर स्वार झाल्या होत्या.

 या तिरंगा यात्रेत उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार  मनीषा चौधरी,आमदार सुनील राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व नगरसेवक, पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा सहभागी झाल्या होत्या.

मालाड पश्चिम नटराज मार्केट शिवमंदिर येथून निघालेल्या यात्रेचा समारोप बोरिवली येथील स्वामी विवेकानंद चौकात झाला. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी यांनी 25000  नागरिकांच्या मेळाव्याला संबोधित केले. तर सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, मुंबई भाजप सचिव योगेश वर्मा, माध्यम व्यवस्थापक विनोद शेलार यांनी केले. या ऐतिहासिक अखंड तिरंगा यात्रेची सांगता राष्ट्रगीताने झाली.

टॅग्स :स्वातंत्र्य दिनयोगेश सागरमुंबई