लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लसीकरण मोहिमेच्या २० दिवसांनंतर आतापर्यंत ६८ हजार आरोग्य सेवकांना डोस देण्यात आला. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचेही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस वेळेत मिळवा यासाठी उपलब्ध साठ्यातून २५ हजार डोस राखून ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी ७८ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी डोस घेतले.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या मोहिमअंतर्गत दीड लाख आरोग्यसेवकांना कोविड-१९ पासून संरक्षण करणारी लस देण्यात येत आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याने लसीकरणाला ५० टक्के उपस्थिती होती. त्यामुळे महापालिकेने कर्मचाऱ्यांचे समुपदेशन, कोणत्याही केंद्रात जाऊन डोस घेण्याची मुभा आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यांनतर लसीकरण मोहिमेला वेग आला.
दरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांना २८ दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्याचवेळी अत्यावश्यक सेवेतील दीड लाख कर्मचाऱ्यांचेही लसीकरण केले जाईल. मात्र अद्याप लसींचा नवीन साठा आला नसल्याने उपलब्ध साठ्यातील ३० हजार लस राखून ठेवण्यात येणार आहे. त्याचवेळी लसीचा आणखी साठा मिळवण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
शुक्रवारी ८,२९९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाकरिता बोलावण्यात आले होते, पण यापैकी ५,८८३ कर्मचाऱ्यांनी डोस घेतला. परळ येथील के. ई. एम रुग्णालयात सर्वाधिक ८२४ कर्मचाऱ्यांना डोस देण्यात आला. त्या खालोखाल राजावाडी रुग्णालयात ८१० आणि नायर रुग्णालयात ७०२ कर्मचाऱ्यांना डोस देण्यात आला.
......................