लॉकडाऊनच्या काळात सायबरचे २५१ गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 04:57 PM2020-04-21T16:57:10+5:302020-04-21T16:57:35+5:30
५० आरोपींना अटक
मुंबई - कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत .महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २५१ गुन्हे दाखल केले आहेत.
टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये ज्या २५१गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी ८ गुन्हे अदखलपात्र (N.C )आहेत.
त्यामध्ये बीड २७, पुणे ग्रामीण २०, मुंबई १७, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली ११, नाशिक ग्रामीण १०, नाशिक शहर १०, जालना ९, सातारा ८, नांदेड ८, परभणी ७, ठाणे शहर ६, सिंधुदुर्ग ६, नागपूर शहर ५, नवी मुंबई ५,सोलापूर ग्रामीण ५, लातूर ५, बुलढाणा ५, ठाणे ग्रामीण ५, अमरावती ४, पुणे शहर ४, गोंदिया ४, सोलापूर शहर ३, हिंगोली ३, रायगड २, वाशिम १,धुळे १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे .
या सर्व गुन्ह्यांचे विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ११२ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ८७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विडिओ शेअर प्रकरणी ५ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा गैरवापर केल्या प्रकरणी ४२ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत ५० आरोपींना अटक केली आहे.
धुळे शहरामध्ये एका नवीन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ,सदर गुन्ह्यातील आरोपीने ,सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीला धार्मिक रंग देऊन सदर विषाणूचा प्रसार एका धर्माचेच लोक करत आहेत या आशयाचा मजकूर असणाऱ्या पोस्ट्स फेसबुकवर टाकल्या यामुळे परिसरातील शांततेचा भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता होती .
पुणे ग्रामीण जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये काल एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . ज्यामुळे पुणे ग्रामीण जिल्ह्यांतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या २० वर गेली आहे .सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींनी व्हाट्सअँप ग्रुपवरून व आपल्या व्हाट्सअँप स्टेटसवर कोरोनाबाधित व्यक्तींबद्दल चुकीची माहिती पाठवून अफवा पसरविली होती .