- स्नेहा मोरेमुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नुकत्याच एका संकेतस्थळाने केलेल्या आरोग्यविषयक अहवालात २५.२ टक्के मुंबईकर ‘वजनदार’ असून ४.४ टक्के मुंबईकर लठ्ठ असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.१९.२ टक्केमुंबईकरांचे वजन निरोगी स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून कमी असल्याची चिंताजनक बाबही या अहवालातून उघडकीस आली आहे. मुंबईकरांची जीवनशैली इतकी आळशी आणि अनियमित झाली आहे की, आता त्यांच्या जीवनाला अनेक आजारांच्या सावटाने घेरले आहे. या अहवालानुसार, मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात असल्याचे समोर आले आहे. अहवालानुसार, ४.४ टक्के मुंबईकरांची लठ्ठपणाची समस्या गंभीर आहे. केवळ ३९ टक्के मुंबईकरांचेच वजन योग्य असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. १२.६ टक्के मुंबईकरांना मधुमेह, १४.३ टक्के जणांना कोलेस्ट्रॉलचा त्रास, तर १५.१ टक्के मुंबईकरांना रक्तदाबाची समस्या असल्याचे समोर आले आहे. १५.७ टक्के जणांना अॅलर्जी, ११.३ टक्के जणांना थायरॉइड तर, ३१.५ टक्के मुंबईकरांना अपचनाचा त्रास असल्याचेही अहवालातून समोर आले आहे.या अहवालातील निष्कर्षानुसार, राष्ट्रीय पातळीवर चंदीगढ आरोग्याच्या दृष्टिकोनातून निरोगी आहे. तर कोलकाता हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वांत रोगट किंवा घातक असल्याचे म्हटले आहे. मुंबईचा विचार केल्यास मुंबई आजारांच्या विळख्यात असून अन्य शहरांच्या तुलनेत १५व्या स्थानावर आहे.निरामय आणि निरोगी आयुष्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग कायमच करीत असतो. या प्रयोगांमध्ये आहार आणि व्यायामाचा प्रामुख्याने समावेश असतो. परंतु, ताणतणाव, झोप या गोष्टींचा विचार फार कमी वेळा केला जातो. अलीकडे निद्रानाश या आजाराचे प्रमाण वाढले असल्याचे ठळकपणे निदर्शनास येते, असे डॉ. नितीन शहाणे यांनी सांगितले.अहवालातील काही प्रमुख निरीक्षणे- केवळ २.८ टक्के मुंबईकर मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन करतात.- २१.४ टक्के मुंबईकर वर्षातून दोनदा आजारी पडतात.- मुंबईकरांची सरासरी झोप ७ ते ८ तासांऐवजी केवळ ६ तास आहे.- ३६.१ टक्के मुंबईकर मद्यसेवन करतात, तर १९.५ टक्के मुंबईकरांना धूम्रपानाचे व्यसन आहे.
२५.८ टक्के मुंबईकर ‘वजनदार’, तर ४.४ टक्के लठ्ठ; आरोग्यविषयक अहवालातील निरीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 2:52 AM