Join us  

'बिग बॉस'चा धाक वाढणार; मुंबईतील पाच प्रमुख सरकारी रुग्णालयांत बसविले २,५७४ सीसीटीव्ही

By संतोष आंधळे | Published: August 14, 2024 6:19 AM

निवासी डॉक्टरांची ही मागणी मान्य करण्यासाठी आता रुग्णालय प्रशासन पुढे सरसावले आहे.

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोलकत्ता येथील निवासी डॉक्टरांच्या मृत्यूनंतर राज्यात निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने रुग्णालय परिसरातील सुरक्षेचा आढावा घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील पाच प्रमुख रुग्णालयात सध्याच्या घडीला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून २,५७४ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तसेच यापुढे ज्या ठिकाणी सीसीटीव्हीची गरज आहे, त्या ठिकाणी नव्याने सीसीटीव्ही बसविणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई शहरात ज्या ठिकाणी संपूर्ण राज्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामध्ये जे जे, केइएम, सायन, नायर आणि कूपर पाच प्रमुख रुग्णालयाचा समावेश आहे. या पाचही सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांचा परिसर मोठा आहे. त्यामुळे नियमितपणे निवासी डॉक्टरांना उपचार देण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयात परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. त्यासोबत त्या ठिकाणी सुरक्षारक्षकाची नेमणूकसुद्धा करण्यात आली आहे.

आणखी ३०० सीसीटीव्ही वाढविणार

निवासी डॉक्टरांनी ज्या काही मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये अद्ययावत सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षकांची संख्या पुरेशी असावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांची ही मागणी मान्य करण्यासाठी आता रुग्णालय प्रशासन पुढे सरसावले आहे. त्यानुसार रुग्णालयाचा आढावा घेऊन ही संख्या वाढविण्यासाठी प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे पटविण्यात येणार आहे. जे. जे. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या दृष्टीने सध्याच्या सीसीटीव्ही व्यतिरिक्त आणखी ३०० सीसीटीव्ही वाढविले जाणार आहे. तसेच परिसरात ज्या ठिकाणी पथदिव्यांची अतिरिक्त गरज आहे त्या ठिकणी ते लावले जाणार आहे.

निवासी डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी सुरक्षेच्या दृष्टीने ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, त्या पूर्ण करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. त्यानुसार ज्या ठिकणी सुरक्षारक्षक आणि अतिरिक्त सीसीटीव्ही लागणार आहे त्या ठिकाणी नियोजन अधिष्ठाताच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी 'ऑन कॉल ड्युटी निवासी डॉक्टरांसाठी अद्ययावत खोलीची व्यवस्था नाही त्या ठिकाणी ती करण्यात येणार आहे.- डॉ. नीलम अंड्राडे, संचालक, महापालिकाप्रमुख रुग्णालये

सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षकांची संख्या किती असावी यादृष्टीने यापूर्वीच आढावा घेण्यात आला आहे. त्यात पोलिसांची मदत घेण्यात आली होती. त्यांनी शिफारस केल्याप्रमाणे ती संख्या वाढविण्यात येणार आहे.- राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभाग

 

टॅग्स :डॉक्टरसंपमुंबईहॉस्पिटल