259 वातानुकूलित बस भंगारात;बेस्ट प्रशासनाचा प्रस्ताव समितीच्या पटलावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 03:43 AM2017-09-08T03:43:14+5:302017-09-08T03:43:26+5:30
पांढरा हत्ती ठरल्यामुळे बंद करण्यात आलेल्या वातानुकूलित २५९ बस अखेर भंगारात काढण्याची वेळ बेस्ट उपक्रमावर आली आहे.
मुंबई : पांढरा हत्ती ठरल्यामुळे बंद करण्यात आलेल्या वातानुकूलित २५९ बस अखेर भंगारात काढण्याची वेळ बेस्ट उपक्रमावर आली आहे. या बसची दुरुस्ती अथवा पुनर्वापर शक्य नाही; तसेच त्यांचे आयुर्मानही संपुष्टात आल्याने या बस मोडीत काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे.
बेस्ट उपक्रमाने २००९मध्ये वातानुकूलित बस खरेदी केल्या. खाजगी वाहनांतून फिरणाºया प्रवासी वर्गाला खेचण्यासाठी बेस्टने ही सेवा सुरू केली. मात्र सुरुवातीपासूनच या बस सेवेला अल्प प्रतिसाद मिळाला. उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होऊ लागल्याने वातानुकूलित बस बेस्टसाठी डोईजड ठरू लागल्या. तरीही नगरसेवकांचा दबाव आणि प्रतिष्ठेखातर या बस सुरू राहिल्या. यामुळे बेस्टची आर्थिक तूट दरवर्षी वाढत गेली.
या एका बसची किंमत ५५ ते ६५ लाख रुपये होती. मात्र या बस नादुरुस्त होणे, वारंवार बंद पडणे असे प्रकार घडू लागले. या बसच्या इंजिनमध्ये बिघाड होऊन गाडीला आग लागण्याच्या घटनाही घडल्या. अखेर बेस्टला टाळे लागण्याची वेळ आल्याने बेस्टने तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार सर्वप्रथम वातानुकूलित बस बंद करण्यात आल्या. त्यानुसार वातानुकूलित बस एप्रिल २०१७पासून चालवणे बंद करण्यात आले आहे.
कौतुक नको, आर्थिक मदत द्या!
बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत देण्याबाबत अनुत्सुक असलेल्या महापालिकेने मुसळधार पावसातील ‘बेस्ट’ कामगिरीचे मात्र कौतुक केले आहे. हीच संधी साधून बेस्टने पालिका आयुक्तांकडे पुन्हा मदतीसाठी साकडे घातले आहे.मुंबईत २९ आॅगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसात रेल्वेसह इतर सर्व खाजगी वाहतूक सेवा बंद पडल्या. मात्र बेस्ट उपक्रमाने जादा बसगाड्या चालवित पावसात अडकलेल्या लाखो प्रवाशांना दिलासा दिला.
पालिका आयुक्त अजय मेहता यांनीही याची दाखल घेत बेस्टच्या कामगिरीचे कौतुक केले. यानिमित्ताने पुन्हा एकदा शंभर वर्षांहून अधिक वर्षे सेवा देणाºया बेस्ट परिवहन सेवेचे महत्त्व दिसून आले आहे. आपत्ती काळातही धावून येणाºया बेस्टसारख्या सार्वजनिक सेवेचे मोल लक्षात घेऊन पालिका आयुक्त अजय मेहता यांनी बेस्टला सहकार्य करावे, अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
पे अॅण्ड पार्कच्या कमाईवर बेस्टचा दावा
रस्त्यांवरील मोकळ्या जागांवर पालिकेकडून शुल्क आकारून खाजगी ठेकेदारांना वाहने उभी करण्यासाठी पे अॅण्ड पार्कची कंत्राटे दिली जातात. यातून पालिकेला ३०० ते ४०० कोटी रुपयांचा महसूल मिळत असला, तरी वाहतूककोंडीमुळे बेस्ट उपक्रमाच्या प्रवासी संख्येत घट होते. त्यामुळे बेस्टला पे अॅण्ड पार्कच्या कमाईचा हिस्सा द्यावा, अशी मागणी बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी ठरावाच्या माध्यमातून केली आहे.