मुंबई : वरळी येथील जांबोरी मैदानात तब्बल २५९ नागरिकांनी रक्तदान करीत ‘थेंब रक्ताचा, स्पर्श माणुसकीचा’ हे ब्रीद कायम केले. लोकमत, शिवसेना शाखा क्रमांक १९६ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी रक्तदानाचा महायज्ञ पार पडला. रक्तदानासाठी तरुणांपासून प्रौढ नागरिकांनी सकाळपासूनच अत्यंत उत्साहात जांबोरी मैदानावर हजेरी लावली होती.
जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ने ‘रक्ताचं नातं’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. विविध संस्था आणि संघटनांच्या सहकार्याने राज्यभरात रक्तदानाचा महायज्ञ अखंड सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः कोरोना महामारीच्या काळातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेत अधिकाधिक नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून केले होते. त्यांच्या या आवाहनाला वरळीतील शिवसैनिकांनी तत्परतेने प्रतिसाद दिला. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रक्तदानाचे महायज्ञ सुरू झाला.
‘थेंब रक्ताचा, स्पर्श माणुसकीचा’ या ब्रीदवाक्यासह जांबोरीतील महारक्तदान शिबिर सुरू झाले. सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदानाचा कालावधी ठेवण्यात आला. तब्बल तीनशे नागरिकांनी रक्तदानासाठी हजेरी लावली. यातून एकूण २५९ बाटल्या रक्त जमा करण्यात आले. खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, माजी आमदार सुनील शिंदे, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस निशिकांत शिंदे, शाखाप्रमुख जीवबा केसरकर, महिला शाखाप्रमुख संगीता जगताप आणि युवासेना शाखा अधिकारी विनायक भोले आदी मान्यवर शिबिरात उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि गृहोपयोगी साहित्यही देण्यात आले.
फोटोओळ - शिवसेना शाखा क्रमांक १९६ च्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात आज एकूण २५९ दात्यांनी रक्तदान केले. स्थानिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.