मुंबई - मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. मात्र मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी स्टेशन परिसरात उपस्थित असलेले पोलीस भयभीत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांनी सीएसएमटी स्टेशनातून पळ काढल्याचे फोटोग्राफर सबॅस्टियन डि'सुझा यांनी म्हटलं आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनवर बेछूट गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचे फोटो सबॅस्टियन डि'सुझा यांनी टिपले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
डि'सुझा यांनी काढलेला कसाबचा फोटो न्यायालयात त्याच्याविरुद्धच्या खटल्यात महत्त्वाचा पुरावा ठरला होता. मात्र स्टेशन परिसरात असलेल्या पोलिसांनी कसाब आणि अबू इस्माईलला ठार मारले असते तर अनेक लोकांचे जीव वाचले असते असे सबॅस्टियन डि'सुझा यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबर 200८ रोजी रात्री समुद्रमार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. त्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यामध्ये अधिकाऱ्यांसह शेकडो निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर अनेक जण जखमी झाले होते.