Join us

मंत्रालयात सापडली २६ जिवंत काडतुसे

By admin | Published: August 14, 2015 1:36 AM

मंत्रालयातील एका कचरापेटीत एक-दोन नव्हे, तर तब्बल २६ जिवंत काडतुसे मिळाल्याने काहीकाळ सुरक्षा कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली होती. मात्र ड्युटीला असलेल्या एका

मुंबई : मंत्रालयातील एका कचरापेटीत एक-दोन नव्हे, तर तब्बल २६ जिवंत काडतुसे मिळाल्याने काहीकाळ सुरक्षा कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली होती. मात्र ड्युटीला असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलकडून ही काडतुसे गहाळ झाल्याचे समजल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नागनाथ नाईक असे या पोलिसाचे नाव असून, तो ठाणे आयुक्तालयांतर्गत कर्मचारी आहे. दुर्लक्ष केल्यामुळे त्याची आता खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे. नागनाथ नाईक हा एका लोकप्रतिनिधीच्या सुरक्षेसाठी कार्यरत आहे. गेल्या शुक्रवारी तो मंत्रालयात आला असताना त्याच्याकडील ९ एमएम पिस्तूलमधील २६ जिवंत काडतुसे नजरचुकीने गहाळ झाली. शोध घेऊनही न सापडल्याने त्याने त्याबाबत मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. दुसऱ्या दिवशी मंत्रालयातील एक स्वच्छता कामगार सातव्या क्रमांकाच्या गेटजवळील तळमजल्यावर एका कचरापेटीतील कचरा काढत असताना त्याला २६ काडतुसे असलेली पिशवी मिळून आली. त्याने तातडीने ती सुरक्षा विभागाकडे सुपुर्द केली. मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याला कळवून ही काडतुसे त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)