चार उड्डाणपुलांच्या सफाईसाठी २६ कोटी! पुलाखालील भंगारगाड्या, बकालपणा होणार इतिहासजमा
By सीमा महांगडे | Published: January 15, 2024 09:44 AM2024-01-15T09:44:45+5:302024-01-15T09:45:40+5:30
विविध १७ कामे केली जाणार, उड्डाणपुलाखालील भंगारगाड्या, बकालपणा होणार इतिहासजमा.
सीमा महांगडे, मुंबई : उड्डाणपुलावरून सुसाट वाढणाऱ्या मुंबईचा वेग लक्षात येत असला, तरी याच उड्डाणपुलाच्या खालची स्थिती मात्र विदारक असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसते. कुठे भंगारातल्या गाड्या, कुठे अवैध पार्किंग, कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसते. या उड्डाणपुलाखालच्या जागांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी आता पालिकेने कंबर कसली असून, या उड्डाणपुलांचा ‘हायटेक विकास’ करण्याचे नियोजन आहे. या सुशोभीकरणासाठी २६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
मुंबईची प्रतिमा उंचावण्यासाठी राज्य सरकार, पालिकेतर्फे ऑक्टोबर २०२२ पासून मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या जागांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पात जे. जे., संजय गांधी राष्ट्रीय उद्यान उड्डाणपूल, मागाठाणे, दहिसर येथील आनंदनगर उड्डाणपूल इत्यादी पुलांखाली सौंदर्यीकरणाची विविध प्रकारची १७ कामे केली जाणार आहेत. जेव्हीएलआर ठरला ‘अनलकी’
के पूर्व विभागातील अंधेरी येथील पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी हा उड्डाणपूल आहे.
ठाण्याकडून आलेली वाहने याच उड्डाणपुलावरून पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जातात. या उड्डाणपुलाखालीही पार्किंग, कचरा, अतिक्रमणाचे साम्राज्य पसरले आहे. उड्डाणपुलाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, काही कारणास्तव निविदा प्रक्रिया सुरू होऊनही या उड्डाणपुलाचे काम सध्या होणार नसल्याची माहिती मिळत आहे. यासाठी नव्याने प्रस्ताव तयार केला जात असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मागाठाणे उड्डाणपूल :-
बोरिवली परिसरात आर मध्य विभागात येणारा मागाठाणे उड्डाणपूल हा एक महत्त्वाचा उड्डाणपूल मानला जातो. मात्र, येथे समाजकंटकांनी उपद्रव केल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. आर मध्य विभागाकडून या उड्डाणपुलाचेही सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, मागाठाणे उड्डाणपुलाच्या ६ हजार ७२० चौरस मीटर जागेत हे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
ही होणार कामे :-
ज्येष्ठ नागरिकांसाठी निवांत बसण्याची सुविधा.
फुलांची झाडे लावून छोटे उद्यान विकसित केले जाणार आहेत.
ॲम्फी थिएटरही असणार आहे.
लहान मुलांसाठी असणाऱ्या खेळांच्या सुविधा पालिकेमार्फत मोफत दिल्या जाणार आहेत.
जे. जे. उड्डाणपूल :-
सर जे. जे. उड्डाणपुलाचे नामकरण ‘कुतूब ए कोकण हजरत मखदूम अली माहिमी’ असे करण्यात आले आहे. हा उड्डाणपूल भायखळा ते सीएसएमटी यांना जोडणारा आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने व्यावसायिक इमारती आणि गाळे आहेत. त्यामुळे येथे व्यापारी आणि ग्राहकांची गर्दी दिसते. यामुळे उड्डाणपुलाच्या खालील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. शिवाय फेकलेला कचरा अडकल्याने घाण साचली आहे.
उड्डाणपुलाखाली सौंदर्यात भर पडेल अशी शिल्पं बसविणार.
यासाठी बेस्टच्या निकामी गाड्यांचा वापर केला जाणार आहे.
त्यात वाचनालय, कलादालन, उपाहारगृह तयार केले जाणार आहे.
पालिकेच्या ए, बी आणि सी विभागाने पायलट प्रोजेक्ट तयार केला आहे. तसेच ई-निविदा प्रक्रिया सुरू करून अर्ज मागविले आहेत.
ही कल्पना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल :-
जे जे उड्डाणपूल हा दक्षिण मुंबईतील हा महत्त्वाचा उड्डाणपूल आहे. पुलाखालील जागी घाण होऊन दुर्गंधी पसरली आहे. पहिल्यांदाच वेगळी संकल्पना वापरून येथील विकास केला जात आहे. लोकांना ही कल्पना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल -उद्धव चंदनशिवे, सहायक आयुक्त, बी विभाग.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान उड्डाणपूल :-
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेमध्ये अतिक्रमणे वाढली आहेत. फेरीवाले आपले साहित्य या जागेत ठेवत असल्याने कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. हे हटवून या उड्डाणपुलाच्या ६ हजार ७०० चौरस मीटर परिसरात पालिकेने सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम उपनगरात पहिले स्केट पार्क यानिमित्ताने उभे राहणार आहे. या पुलांची आकर्षक रंगरंगोटी केली जाणार आहे. पुलाच्या भिंतीवर निसर्ग, प्राणी यांची चित्रे रेखाटली जाणार आहेत. पुलांखाली महिलांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्याचाही पालिकेचा विचार आहे.
अशी होणार विकासकामे :-
पहिले स्केट पार्क
पर्यटक आणि पादचाऱ्यांसाठी पायवाट असेल.
लँडस्केपिंग करण्यात येणार आहे.
वन्यप्राण्यांवर आधारित शिल्पे आणि भित्तीचित्रे.
उड्डाणपुलाखाली शोभेल अशा स्ट्रीट फर्निचरची व्यवस्थाही करणार आहे.