खोट्या कागदपत्रांनी विम्याचे २६ दावे; ३१.२८ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 09:58 AM2024-01-04T09:58:56+5:302024-01-04T09:59:51+5:30
या प्रकरणी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय असून, आठ जणांविरोधात अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे जवळपास विम्याचे २६ दावे दाखल करत तीन वर्षांत एका खासगी थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर (टीपीए) कंपनीची लाखोंची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार अंधेरीत मंगळवारी उघडकीस आला. मुख्य म्हणजे या सगळ्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय असून, आठ जणांविरोधात अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार प्रमोद तुरबे (४५) हे विडाल हेल्थ कंपनीमध्ये सहायक उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर विविध आरोग्य विमा कंपनीच्या क्लेम प्रोसेस करून दाखल झालेल्या क्लेमची तपासणी करणे, देय रकमेबाबत योग्यता निश्चित करणे, अशी जबाबदारी आहे. तुरबे यांच्या तक्रारीनुसार, त्यांना राजकुमार गौड नावाने ६, आरती गौड नावाने ३, कविता गौड नावाने ५, मीना गौड नावाने ५, सुनीता गौड नावाने २, कुसुम गौड नावाने ४, असे एकूण २६ क्लेम सादर करण्यात आले होते. त्यामध्ये कांदिवलीचे साईकृपा रुग्णालय, विरारचे संगम रिद्धी, अंधेरीचे रक्षा व प्राईम, मालाडचे हयात व अनुराधा, वसईचे श्री आर. के. अगरवाल या रुग्णालयांच्या कागदपत्रांचा उल्लेख करत ३२ लाख ९५ हजार २२१ रुपयांचा दावा करण्यात आला होता. यापैकी ३१ लाख २८ हजार रुपये कंपनीने राजकुमार व इतरांच्या खात्यात ट्रान्सफर केले होते
बनावट कागदपत्रांचा वापर
कंपनीतला कर्मचारी अजित पुजारी (३२) हा बनावट इन्शुरन्स क्लेम दाखल करत फसवणूक करत असल्याची माहिती कंपनी चेअरमनना डॉ. राजीव सिंग नामक ई-मेलमार्फत मिळाली. कंपनीने याप्रकरणी चौकशी करण्यासाठी रचित सरिन नामक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली टीम नेमली. ज्यात बंद रुग्णालय, अस्तित्वात नसलेला डॉक्टर, बनावट कागदपत्रे याचा वापर झाल्याचे उघड झाले. त्यानुसार कंपनी कर्मचारी पुजारी तसेच अन्य आरोपींच्या विरोधात अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चौकशीत धक्कादायक गोष्टी उघड!
गोरेगाव प्राईम रुग्णालयात राजीव सिंग किंवा क्षितिज शहा नावाचे डॉक्टरच नव्हते. जिथे राजकुमार गौडने उपचार घेतल्याचा दावा केला होता.
साईकृपा आणि अनुराधा तसेच हयात रुग्णालयात आरोपींनी उपचार घेतल्याची कोणतीही कागदपत्रे नव्हती.
रक्षा रुग्णालयात कागदपत्रे आढळली ज्यात सर्वच पेशंटवर उपचार करणाऱ्या डॉक्टरचे नाव क्षितिज शहा नमूद होते.
संगम रिद्धी हे कोरोना काळापासून, तर श्री आर. के. अगरवाल हे गेली ४ वर्ष तसेच फ्रॅक्चर अँड ॲक्सिडेंट हॉस्पिटल एप्रिल, २०२२ पासून बंद असल्याचे उघड झाले.